Latest

AUSvsIRE T20WC : ऑस्ट्रेलियन गोलंदाजांच्या भेदक मा-यापुढे आयर्लंड उद्ध्वस्त!

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : AUSvsIRE T20WC : ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी केलेल्या भेदक मा-यासमोर आयर्लंडच्या फलंदाजांनी अक्षरश: शरणागती पत्करली. गत विजेत्या कांगारूंनी दिलेल्या 180 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आयर्लंड संघातील फलंदाज मैदानावर हजेरी लावून तंबूत परतले. केवळ लॉर्कन टकर (नाबाद 71) याने एकाकी झुंज देत विजयासाठी धडपड केली. आयर्लंडचा संपूर्ण संघ 18.1 षटकात 134 धावांत गारद झाला. याचबरोबर यजमान ऑस्ट्रेलियाने हा सामना 42 धावांनी जिंकून सेमी फायनलच्या शर्यतीतील आपले आव्हान कायम ठेवले आहे.

तत्पूर्वी, ब्रिस्बेनच्या मैदानावर आयर्लंडचा कर्णधार अँड्र्यू बालबर्नीने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर पहिला फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने 20 षटकांमध्ये 5 गड्यांच्या मोबदल्यात 179 धावा केल्या. कर्णधार अॅरॉन फिंचने 44 चेंडूत 63 धावा केल्या. आयर्लंडच्या बॅरी मॅकार्थीने 4 षटकांत 29 धावा देत 3 बळी घेतले.

180 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आयर्लंडच्या संघाने पॉवरप्लेमध्येच पाच विकेट गमावल्या. दोन फलंदाजांना खातेही उघडता आले नाही. आणि दोघांना दुहेरी आकडाही पार करता आला नाही. आयर्लंडला 10व्या षटकात सहावा धक्का बसला. संघाचा फलंदाज गॅरेथ डेलनी 10 चेंडूत 14 धावा करून बाद झाला. यानंतर टकर शेवटपर्यंत नाबाद राहिला. त्याने 48 चेंडूत नाबाद 71 धावांची खेळी केली.

ऑस्ट्रेलियाचे फलंदाज असे झाले बाद

डावाच्या तिसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर बॅरी मॅकार्थीने सलामीवीर डेव्हिड वॉर्नरला झेलबाद केले. वॉर्नर शॉर्ट पिच चेंडू लेग-स्टंपवर खेळण्यासाठी गेला. पण खराब प्लेसमेंटमुळे शॉर्ट फाइन लेगवर उभा असलेल्या मार्क एडायरने त्याने फटकावलेला चेंडू झेलला. वॉर्नरने 7 चेंडूत 3 धावा केल्या. 9 व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर बॅरी मॅकार्थीने मिचेल मार्शलाही पॅव्हेलियनमध्ये पाठवले. मार्शने ऑफ स्टंपच्या बाहेरील गुड लेन्थ चेंडू कट करण्याचा प्रयत्न केला. पण चेंडूने बॅटच्या बाहेरची कड घेतली आणि तो थेट यष्टिरक्षक टकरच्या हातात गेला. मार्शने 22 चेंडू, 2 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 28 धावांची खेळी खेळली. 11 व्या षटकातील पाचव्या चेंडूवर ग्लेन मॅक्सवेलच्या रूपाने ऑस्ट्रेलियाला तिसरा धक्का बसला. जोश लिटलने फुलर लेन्थ आऊट स्विंग करत चेंडू फेकला. मॅक्सवेलने या चेंडू कव्हरच्या वरून मारायला गेला. पण फटका खेळताना मॅक्सवेलचा तोल गेला आणि चेंडू बॅटच्या बाहेरील कडेवर आदळला. यानंतर हा चेंडू विकेटच्या मागे गेला. यष्टीरक्षकाने कसली ही चूक केली नाही आणि झेल पकडला. मॅक्सवेलने 9 चेंडूत एका षटकाराच्या मदतीने 13 धावा केल्या. मॅकार्थीने 17 व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर कर्णधार अॅरॉन फिंचची विकेट घेतली. आऊटसाईड ऑफ स्टंपवर फेकलेला लोअर फुल टॉस चेंडू फिंचने लाँग ऑनच्या दिशेने फटकावला. पण तिथे उभ्या असलेल्या मार्क एडायरने त्याचा झेल पकडला. फिंचने 44 चेंडूत 63 धावा केल्या. त्याने 5 चौकार आणि 3 षटकारही मारले.

ऑस्ट्रेलियाची प्लेईंग इलेव्हन :

अॅरॉन फिंच (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, टिम डेव्हिड, मॅथ्यू वेड (विकेटकीपर), पॅट कमिन्स, अॅडम झाम्पा, जोश हेझलवूड.

आयर्लंडची प्लेईंग इलेव्हन :

पॉल स्टर्लिंग, अँड्र्यू बालबिर्नी (कर्णधार), लॉर्कन टकर (विकेटकीपर), हॅरी टेक्टर, कर्टिस कॅम्पर, जॉर्ज डॉकरेल, गॅरेथ डेलेनी, मार्क एडेयर, फिन हॅन्ड, बॅरी मॅककार्थी, जोशुआ लिटल.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT