Latest

मोठ्या सौरवादळामुळे आकाशात रंगला ‘ऑरोरा’चा खेळ

Arun Patil

लंडन : ज्यावेळी पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राला सौरकण धडकतात, त्यावेळी विशेषतः ध्रुवीय वर्तुळातील किंवा जवळच्या प्रदेशातील आसमंतात रंगीबेरंगी प्रकाशझोतांचा खेळ रंगतो. त्यालाच 'नॉर्दन लाईटस्' किंवा 'ऑरोरा' असे म्हटले जाते. सौरवादळाची तीव्रता अधिक असेल, तर इतरही ठिकाणी असे ऑरोरा दिसतात. आता तब्बल वीस वर्षांनी जगातील सर्वात शक्तिशाली सौरवादळ 10 मे रोजी पृथ्वीला धडकल्याने अनेक ठिकाणी असा ऑरोरा पाहायला मिळाला. टास्मानियापासून ब्रिटनपर्यंत अनेक देशांमध्ये हे रंगीबेरंगी प्रकाशझोत दिसले. भारतातही लडाखच्या आसमंतात ऑरोरा दिसला. मात्र, या सौरवादळामुळे कृत्रिम उपग्रहांच्या कार्यात बाधा निर्माण झाली तसेच पॉवर ग्रीडस्चेही नुकसान झाले.

अमेरिकेच्या 'नासा'ने म्हटले, की या सौरवादळाचा परिणाम आठवड्याच्या अखेरपर्यंत राहील. उत्तर किंवा दक्षिण ध्रुवालगत ऑरोरा निर्माण होत असतो. मात्र, सौरवादळाची तीव्रता अधिक असेल तर तो अन्यही काही भागांमध्ये दिसून येतो. अशा वेळी जगभरातील सॅटेलाईट ऑपरेटर्स, एअरलाईन्स आणि पॉवर ग्रीड ऑपरेटर अलर्ट असतात. जगभरातील अनेक लोकांनी आसमंतात रंगलेल्या रंगीबेरंगी ऑरोराला पाहण्याचा आनंद लुटला. विशेष म्हणजे भारतात लडाखच्या हानले या दुर्गम व दूरवरच्या भागातही आकाशात लाल-गुलाबी रंगाचा ऑरोरा दिसला.

सौर वादळाचे कारण म्हणजे सूर्यावरील कोरोनल मास इजेक्शन. त्यावेळी सूर्यापासून निघालेले सौरकण अंतराळात विखुरतात. हेच कण पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राला धडकले की ऑरोरा निर्माण होतो. आता आलेले सौरवादळ हे ऑक्टोबर 2003 मधील 'हॅलोविन' सौरवादळानंतरचे सर्वात मोठे आहे. हॅलोविन सौरवादळामुळे स्वीडनमध्ये ब्लॅकआऊट झाला होता. तसेच दक्षिण आफ्रिकेतीलग् ग्रीड ठप्प झाले होते. संशोधकांनी आता म्हटले आहे, की या सौरवादळामुळे येणार्‍या काही दिवसांमध्येही आणखी सौरकण पृथ्वीवर येऊ शकतात. जगातील सर्वात शक्तिशाली सौरवादळ सन 1859 मध्ये पृथ्वीला धडकले होते. त्याचे नाव होते 'कॅरिंग्टन इव्हेंट'. या वादळामुळे टेलिग्राफ लाईन्स पूर्णपणे खराब झाल्या होत्या. काही टेलिग्राफ लाईन्सना आगही लागली होती.

'जी-5' श्रेणीचे वादळ

अमेरिकेच्या राष्ट्रीय समुद्रीय आणि वायुमंडलीय प्रशासनाने म्हणजेच 'नोआ'ने या भू-चुंबकीय वादळाला 'जी-5' श्रेणीचे ठरवले आहे. भू-चुंबकीय वादळे जी-1 ते जी-5 पर्यंत मोजली जातात. त्यामध्ये 'जी-5' हे सर्वात वरच्या स्तराचे वादळ असते. या वादळामुळे सॅटेलाईटस्, पॉवर ग्रीडच्या कामात अडथळे येतात. संवादाच्या उपकरणांमध्ये यामुळे बाधा येऊ शकते. तसेच अनेक ठिकाणी विद्युतपुरवठ्याच्या समस्या येऊ शकतात.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT