औरंगाबाद ; पुढारी वृत्तसेवा : गेल्या अनेक दिवसांपासून औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर करण्यात यावे, अशी मागणी जोर धरत होती. या मागणीला अखेर पूर्णविराम मिळाला असून अखेर मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता मिळाली आहे. यात औरंगाबाद शहराला "संभाजीनगर" आणि उस्मानाबाद शहराला "धाराशीव" असे नामकरणास मान्यता मिळाली आहे. शिवसेना मंत्र्यांनी हा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत मांडला. त्याला मंजुरी देण्यात आली आहे.
मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय
- औरंगाबाद शहराच्या "संभाजीनगर" नामकरणास मान्यता. (सामान्य प्रशासन विभाग)
- उस्मानाबाद शहराच्या "धाराशीव" नामकरणास मान्यता. (सामान्य प्रशासन विभाग)
- नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे लोकनेते स्वर्गीय दि.बा.पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ या नामकरणास मान्यता. (नगर विकास विभाग)
- राज्यासाठी हळद संशोधन व प्रक्रिया धोरण लागू करणार. हिंगोली जिल्ह्यात मा. बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्र स्थापन करणार. (कृषि विभाग)
- कर्जत (जि. अहमदनगर) येथे दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) न्यायालय स्थापन करणार (विधि व न्याय विभाग)
- अहमदनगर – बीड-परळी वैजनाथ या नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पाच्या सुधारित खर्चास मान्यता व त्यासाठी राज्य शासनाचा हिस्सा देणार (परिवहन विभाग)
- ग्रामीण भागातील विशेष मागास प्रवर्ग आणि इतर मागास प्रवर्गासाठी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले घरकुल योजना राबविण्यात येणार. (इतर मागास बहुजन कल्याण विभाग)
- विदर्भ विकास मंडळ, मराठवाडा विकास मंडळ व उर्वरित महाराष्ट्र विकास मंडळ ही विकास मंडळे पुनर्गठीत करण्याचा निर्णय. (नियोजन विभाग)
- निवड झालेल्या परंतु मराठा आरक्षण रद्द झाल्याने नियुक्ती न मिळालेल्या एसईबीसी उमेदवारांकरिता अधिसंख्य पदे निर्माण करण्यासाठी विधेयक मांडण्याचा निर्णय ( सामान्य प्रशासन विभाग)
- शासन अधिसुचना ८ मार्च २०१९ अनुसार आकारावयाच्या अधिमुल्याची रक्कम भरण्याच्या कालावधीस मुदतवाढ देण्याचा निर्णय. (महसूल विभाग)
'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.
Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.