Latest

कोपरगाव: सहाय्यक वनसंरक्षक अमोल गर्कल यांना उच्च न्यायालयाचा दणका; कोर्टाच्या अवमान प्रकरणी 50 हजार रुपयांचे वॉरन्ट

अमृता चौगुले

कोपरगाव (नगर): औरंगाबाद उच्च न्यायालयाने सहाय्यक वनसंरक्षक अमोल गर्कल यांना कोर्टाचा अवमान केला म्हणुन पन्नास हजार रुपयांचे वॉरन्ट काढण्यात आले असल्याची माहिती वकील विद्यासागर शिंदे यांनी दिली. याबाबतची अधिक माहिती अशी की, सुनिल आनंदराव यादव यांच्या मालकीची एक पोकलेन व तीन हायवा कंपनीचे डंपर कोपरगाव येथील वन परिक्षेत्र अधिकारी प्रतिभा सोनवणे यांनी राखीव वनामध्ये मुरूमाचे उत्खनन केले, म्हणुन त्यांच्या विरूध्द वन गुन्हा दाखल करत ती वाहने जप्त केली होती.

सदर कार्यवाही विरूध्द वकील विदयासागर शिंदे यांनी सहाय्यक वनसंरक्षक यांच्याकडे व त्यानंतर कोपरगाव येथील जिल्हा न्यायालयात अपील दाखल केले. त्यांनंतर गणेश गाढे यांनी औरंगाबाद उच्च न्यायालयात झालेली कार्यवाही रद्द करण्यासाठी कायदेशीर बाजू मांडली. उच्च न्यायालयाने वन खात्याने केलेली संपुर्ण कार्यवाही रद्द करत जप्त वाहने मुळ मालकास परत देण्याचा आदेश १० एप्रिल रोजी दिला.

सदर आदेश होऊनही अमोल गर्कल यांनी उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्यास नकार दिला. त्यामुळे गर्कल यांच्या विरोधात वकील गणेश गाढे यांच्यामार्फत औरंगाबाद खंडपीठात अवमान याचीका दाखल करण्यात आली होती. अमोल गर्कल यांनी अवमान याचिकेतील आदेश न पाळल्याने नुकतेच हायकोर्टाने त्यांच्या विरूध्द पन्नास हजार मात्रचे वॉरन्ट काढले असल्याची माहिती वकील विद्यासागर शिंदे यांनी दिली. उच्च न्यायालय वन खात्याचा मनमानी कारभारावर प्रचंड संतापलेले होते. या आदेशामुळे वनखात्यातील मुजोरी पुढे आल्याचे दिसुन आले.

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT