Latest

IPL 2024 : आज रंगणार ‘आयपीएल’चा बहुप्रतीक्षित लिलाव!

Arun Patil

दुबई, वृत्तसंस्था : इंडियन प्रीमियर लीगची (IPL 2024) पुढील आवृत्ती भारतात खेळली जाणारी जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग मार्च 2024 मध्ये सुरू होईल. त्यापूर्वी आज 'आयपीएल'चा लिलाव होणार आहे. 'आयपीएल'चा लिलाव पहिल्यांदाच भारताबाहेर होत असून, यावेळी तो दुबईत होणार आहे. या कालावधीत एकूण 333 खेळाडूंचा लिलाव होईल आणि विविध फ्रँचायझी अपेक्षित खेळाडूंना करारबद्ध करण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावत असतील, तर यात आश्चर्याचे कारण असणार आहे.

सहभागी संघांना 77 स्लॉट आहेत, त्यापैकी 30 विदेशी खेळाडूंसाठी राखीव आहेत. 23 खेळाडूंनी 2 कोटी रुपयांच्या ब्रॅकेटमध्ये स्वतःची नोंदणी केली आहे, तर 13 खेळाडूंनी 1.5 कोटी रुपयांच्या स्लॉटमध्ये राहणे पसंत केले आहे. 333 खेळाडूंपैकी 214 भारतीय आणि 119 विदेशी खेळाडू आहेत, ज्यात दोन सहयोगी देशांचा समावेश आहे. कॅप्ड खेळाडूंची एकूण संख्या 116 आहे, तर अनकॅप्ड खेळाडूंची संख्या 215 आहे.

'आयपीएल'चा लिलाव देशाबाहेर होण्याची ही पहिलीच वेळ आहे. गुजरात टायटन्स 38.15 कोटी रुपयांच्या कमाल पर्ससह लिलावात प्रवेश करेल, तर राजस्थान रॉयल्सकडे सर्वात कमी 14.5 कोटी रुपये पर्समध्ये आहे. त्याआधी हार्दिक पंड्याचे गुजरात टायटन्समधून मुंबई इंडियन्समध्ये जाण्याची चर्चा खूप रंगली होती. पाच वेळा 'आयपीएल' चॅम्पियन्स ठरलेल्या मुंबई इंडियने आगामी हंगामासाठी रोहित शर्माकडे नेतृत्व भूषवत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे.

लिलाव प्रक्रियेच्या वेळेत बदल (IPL 2024)

'आयपीएल'चा पहिला लिलाव भारतीय वेळेनुसार दुपारी अडीच वाजता सुरू होणार होता; पण आता त्याची वेळ बदलली आहे. स्थानिक वेळेनुसार सकाळी 11.30 वाजता सुरू होईल आणि भारतीय वेळेनुसार, लिलाव दुपारी 1.00 वाजता सुरू होईल.

'आयपीएल' लिलावासाठी 333 क्रिकेटपटूंची निवड करण्यात आली आहे. यापैकी 23 खेळाडू आहेत ज्यांनी त्यांची मूळ किंमत 2 कोटी रुपये ठेवली आहे. सध्या 'आयपीएल'च्या आगामी हंगामासाठी 77 खेळाडूंची जागा रिक्त आहे, याचा अर्थ लिलावात जास्तीत जास्त खेळाडू विकले जाऊ शकतात. त्यापैकी 30 परदेशी खेळाडूंसाठी जागा राखीव ठेवण्यात आली आहे.

लिलावात 214 भारतीय, 119 विदेशी खेळाडू समाविष्ट

लिलावासाठी खेळाडूंची यादी 'बीसीसीआय'ने काही दिवसांपूर्वीच जाहीर केली होती. यात एकूण 333 खेळाडूंचा समावेश असून, यापैकी 214 खेळाडू हे भारतीय, तर 119 परदेशी खेळाडू आहेत. दोन खेळाडू कसोटीचा दर्जा प्राप्त नसलेल्या देशांचे आहेत. या खेळाडूंपैकी 116 हे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेले, तर 215 हे आंतरराष्ट्रीय क्रिकेट न खेळलेले आहेत.

'आयपीएल'चा लिलाव सर्व फ्रँचायझींसाठी का महत्त्वाचा?

'आयपीएल'मधील दहाही संघांनी आगामी हंगामासाठी संघात कायम ठेवलेल्या आणि करारमुक्त केलेल्या खेळाडूंची नावे गेल्या महिन्यात जाहीर केली होती. यात काही आश्चर्यकारक निर्णयही समाविष्ट होते. तसेच काही संघांनी खेळाडूंची अदलाबदल करून आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न केला. मात्र, अजूनही बहुतांश संघ समतोल साधण्याचा प्रयत्न करत आहेत आणि यासाठीच खेळाडू लिलाव महत्त्वाचा ठरतो. यात उपलब्ध असलेल्या आणि आपल्याला गरज असलेल्या खेळाडूंवर बोली लावून त्यांना संघात दाखल करून घेण्याचा फ्रँचायझींचा प्रयत्न असतो.

कोणत्या संघाकडे किती रक्कम आणि किती जागा शिल्लक?

गुजरात टायटन्स : 38.15 कोटी रुपये; 8 जागा रिक्त (2 विदेशी खेळाडूंसाठी)
सनरायजर्स हैदराबाद : 34 कोटी रुपये; 6 जागा रिक्त (3 विदेशी खेळाडूंसाठी)
कोलकाता नाइट रायडर्स : 32.7 कोटी रुपये; 12 जागा रिक्त (4 विदेशी खेळाडूंसाठी)
चेन्नई सुपर किंग्ज : 31.4 कोटी रुपये; 6 जागा रिक्त (3 विदेशी खेळाडूंसाठी)
पंजाब किंग्ज : 29.1 कोटी रुपये; 8 जागा रिक्त (2 विदेशी खेळाडूंसाठी)
दिल्ली कॅपिटल्स : 28.95 कोटी रुपये; 9 जागा रिक्त (4 विदेशी खेळाडूंसाठी)
रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु : 23.25 कोटी रुपये; 6 जागा रिक्त (3 विदेशी खेळाडूंसाठी)
मुंबई इंडियन्स : 17.75 कोटी रुपये; 8 जागा रिक्त (चार विदेशी खेळाडूंसाठी)
राजस्थान रॉयल्स : 14.5 कोटी रुपये; 8 जागा रिक्त (तीन परदेशी खेळाडूंसाठी)
लखनौ सुपर जायंट्स : 13.15 कोटी रुपये; 6 जागा रिक्त (दोन परदेशी खेळाडूंसाठी)

या वाहिन्यांवर थेट प्रक्षेपण

स्टार स्पोर्टस् हे आयपीएल 2024 लिलावाचे अधिकृत प्रसारक आहे. स्टार स्पोर्टस् नेटवर्कवर लिलावाचे थेट प्रक्षेपण पाहता येईल. तसेच जिओ सिनेमाच्या वेबसाईटवर 'आयपीएल'चा लिलाव ऑनलाईन दाखवला जाणार आहे. याशिवाय, जिओ सिनेमाच्या अ‍ॅपवर लाईव्ह स्ट्रीमिंग पाहता येईल.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT