Latest

मडगाव : मंत्री सुभाष फळदेसाई यांच्यावर हल्ला

दिनेश चोरगे

मडगाव; पुढारी वृत्तसेवा : सां जुझे दि आरियल येथे रविवारी (दि. 18) स्थापन करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याची सोमवारी दुपारच्या सुमारास पूजा करून परत जात असताना चर्चेचा बहाणा करून काहीजणांनी समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न केला. काही लोकांनी मंत्री फळदेसाई यांच्यावर माती व दगडफेक केली. यावेळी झालेल्या गोंधळामुळे जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. त्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला असून, परिसरात कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

मंत्री फळदेसाई यांनी शिवजयंतीच्या कार्यक्रमात व्यत्यय नको, यासाठी अद्याप पोलिस तक्रार दाखल केलेली नाही. त्यांच्यावर घरीच उपचार करण्यात आले आहेत. सां जुझे दि आरियल येथे खासगी जमिनीत रविवारी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा बसवण्यात आला होता. हा पुतळा उभारण्यासाठी नेत असताना काहींनी डोंगरकापणी व मातीचा भराव घालून सखल भाग बुजवला जात असल्याबद्दल आक्षेप घेतला होता. बेकायदा रस्ता तयार केला जात असल्याचा आरोप काहीजणांनी केला. मात्र, विरोधाची पर्वा न करता शिवप्रेमींनी डोंगरावरील खासगी जागेत हा पुतळा बसवला. रविवारी रात्री उशिरा दिल्लीतून परतलेले मंत्री फळदेसाई यांनी त्याठिकाणी भेट दिली होती.

सोमवारी सर्व धार्मिक कार्यक्रमांसोबत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याची पूजा करण्यात आली. हा कार्यक्रम सुरू असताना तिथे लोक पुन्हा जमा होऊ लागले होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची पूजा करून माघारी निघताना मंत्री फळदेसाई यांच्याशी चर्चा करण्याच्या बहाण्याने काहींनी त्यांच्याशी वाद घालण्यात सुरुवात केली. मंत्री फळदेसाई यांनी त्यांना विरोध करण्याचे कारण विचारले असता जमावाने त्यांना अपशब्द बोलणे सुरू केले. या प्रकारानंतर मंत्री फळदेसाई आपल्या वाहनाच्या दिशेने जात असताना त्यांच्यावर माती व दगडफेक करण्यात आली. आक्रमक झालेले लोक हाती मिळेल ते मंत्री फळदेसाई यांच्या दिशेने फेकून मारत होते. तसेच त्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. यावेळी काहींनी त्यांना घेराव घालत धक्काबुक्कीसुद्धा केली. या हल्ल्यात मंत्री फळदेसाई यांना दुखापत झाली आहे. पोलिस संरक्षणात त्यांना तेथून बाहेर काढण्यात आले. या घटनेनंतर जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला. पोलिस उपअधीक्षक संतोष देसाई यांनी जमावाशी चर्चा करून या विषयावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, लोक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून पोलिस संरक्षण वाढवण्यात आले आहे.

मंत्री फळदेसाई यांच्यावर हल्ला झाल्याचे कळताच त्यांचे समर्थक मोठ्या संख्येने त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले. कोणत्याही परिस्थितीत हा विषय संयमाने घेण्याचे आवाहन मंत्री फळदेसाई यांनी आपल्या समर्थकांना केले.

महिलेकडून पिस्तूल हिसकावण्याचा प्रयत्न

मंत्री फळदेसाई यांच्यावर पूर्वनियोजित हल्ला करण्यात आल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले आहे. एका महिलेने त्यांच्या सुरक्षेसाठी असलेल्या पोलिसाचे पिस्तूल हिसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला. दरम्यान, शिवजयंतीच्या कार्यक्रमांत व्यत्यय येऊ नये यासाठी मंत्री फळदेसाई यांनी घरीच उपचार घेतले. शिवाय पोलिस तक्रारही दाखल केली नाही.

पंचायतीने पाठवले पत्र…

दरम्यान, सां जुझे दि आरियल पंचायतीच्या सरपंच लिंडा फर्नांडिस यांनी जागेचे मालक सरताज मकानदार यांना पत्र पाठवले आहे. सर्व्हे क्रमांक 229/2, 229/5 या जागेत बेकायदा भराव टाकल्याबद्दल पंचायत राज कायदा 66 अन्वये कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तक्रारदार कार्मीना फर्नांडिस व इतरांच्या तक्रारींवरून ही नोटीस बजावण्यात आली आहे. त्या सर्व्हे क्रमांकात सुरू असलेली कामे बंद करून सोपस्कार पूर्ण केल्याची कागदपत्रे पंचायतीसमोर सादर करावीत, असे आदेश दिले आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT