Latest

Atiq Ahmed Shot Dead : डॉन होण्यासाठी अतिक-अशरफची केली हत्या! आरोपींनी सांगितले कारण

रणजित गायकवाड

प्रयागराज, पुढारी ऑनलाईन : Atiq Ahmed Shot Dead : गँगस्टर ते राजकारणी बनलेला अतिक अहमद आणि त्याचा भाऊ खालिद अझीम उर्फ ​​अशरफ यांच्या खळबळजनक हत्येनंतर उत्तर प्रदेश सरकारवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. योगी सरकारने या हत्येच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. संपूर्ण राज्यात कलम 144 लागू करण्यात आले आहे. दरम्यान, अतिक आणि अशरफ यांच्या हत्येतील तिन्ही आरोपी हे प्रयागराज बाहेरील असल्याचे पोलिस तपासातून समोर आले आहे.

माफिया व्हायचे आहे! (Atiq Ahmed Shot Dead)

अतिक आणि अशरफ यांच्यावर गोळीबार करणाऱ्या तिन्ही आरोपींची पार्श्वभूमी गुन्हेगारीची आहे. आरोपींवर यापूर्वी कुठे आणि कोणत्या प्रकारचे गुन्हे दाखल आहेत, याचा तपास पोलीस करत आहेत. चौकशीत आरोपींनी सांगितले की, छोटे-मोठे शूटर्स म्हणून किती दिवस राहणार? आम्हाला मोठे माफिया बनायचे आहे, त्यामुळे आम्ही अतिक आणि अशरफ यांची माध्यमांसमोरच हत्या केली.'

मात्र, तिघांच्या जबाबात विरोधाभास असून तपास सुरू असल्याने पोलिसांनी अद्याप त्यांच्या वक्तव्यावर पूर्ण विश्वास ठेवलेला नाही, अशी सूत्रांकडून माहिती समजते आहे.

आरोपी वेगवेगळ्या जिल्ह्यातील.. (Atiq Ahmed Shot Dead)

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अतिक आणि अश्रफ यांची हत्या करणारे तिघे आरोपी वेगवेगळ्या जिल्ह्यातील आहेत. लवलेश तिवारी, अरुण मौर्य, सनी अशी या तिघांची नावे आहेत. लवलेश तिवारी हा बांदा येथील रहिवासी आहे, तर अरुण मौर्य हा हमीरपूरचा रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले आहे. तर तिसरा आरोपी सनी कासगंज जिल्ह्यातील आहे, असे आतापर्यंतच्या तपासातून पुढे आले आहे. मात्र, चौकशीदरम्यान तिन्ही आरोपींनी आपला एकच पत्ता सांगितल्याची माहितीही समोर आली आहे. त्यामुळे पोलिस त्यांच्या जबाबाची पडताळणी करत आहेत. तपासात एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की, तिन्ही आरोपी अतिक आणि अशरफ यांची हत्या करण्याच्या उद्देशाने प्रयागराज येथे आले होते.

हत्येंनंतर आरोपी ओरडू लागले सरेंडर… सरेंडर… (Atiq Ahmed Shot Dead)

अतिक आणि अश्रफ यांची हत्या केल्यानंतर तिन्ही हल्लेखोरांनी तत्काळ आत्मसमर्पण केले. घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. घटनास्थळावरून तीन बंदुकीची काडतुसे सापडली आहेत. आरोपींकडून एक कॅमेरा, माइक, आयडीही जप्त करण्यात आले आहे. या घटनेनंतर यूपीमध्ये हाय अलर्ट घोषित करण्यात आला असून संवेदनशील भागात पोलिसांची गस्त वाढवण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारे वातावरण बिघडू न देण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT