Latest

कलाटणी देणारा अटल सेतू

Arun Patil

जगभरात भ्रमंती करणार्‍या पर्यटकांकडून तेथील भव्य-दिव्य गोष्टींचे गोडवे ऐकत देशातील अर्धीअधिक जनता लहानाची मोठी झाली; पण त्या तोडीचे किंबहुना त्याहून दर्जेदार, भव्य असे प्रकल्प हाती घेऊन ते निर्धारित काळात पूर्ण करून जगाला हेवा वाटावा अशा प्रकारच्या विचाराचा आजवरच्या राज्यकर्त्यांमध्ये अभाव दिसून आला. नुकतेच भारतातील सर्वात लांब आणि जगातील 12 व्या क्रमाकांच्या सर्वात मोठ्या अटल सेतूचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केले. ही बाब स्वागतार्ह आहे.

पंतप्रधानांनी मुंबई ट्रान्स हार्बर लिंकचे अनावरण केले आणि त्यामुळे मुंबई आणि नवी मुंबई यांच्यातील अंतर बर्‍यापैकी कमी झाले आहे. भारतातला समुद्रावरचा हा सर्वात लांब पूल आहे. त्याला माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नावाने अटल सेतू असे नाव दिले आहे. हा पूल पोलादच्या निर्मितीचे आदर्श उदाहरण आहे. त्यात आयफेल टॉवरपेक्षा 17 पट अधिक पोलादाचा वापर करण्यात आला आहे. याचाच अर्थ हावडा ब्रीजच्या तुलनेत चारपट अधिक. 17.840 कोटी रुपयांच्या खर्चाचा भव्य अटल सेतू हा सुमारे 21.8 किलोमीटर लांब आहे. यावर सहा मार्गिका (लेन) आहेत. याचाच अर्थ मोठ्या प्रमाणात गाड्या एकाचवेळी धावू शकतील. हा सेतू देशाची व्यापारी राजधानी मुंबईच्या सौंदर्यात आणि भव्यतेत भर घालणारा आहे. या पुलावरुन रोज 70 हजारांपेक्षा अधिक गाड्या धावू शकतील. त्यामुळे मुंबईला दिलासा मिळणार आहे. यावरून आपण या पुलाची उपयोगिता लक्षात घेऊ शकतो.

भारताच्या वेगवान विकासासाठी पायाभूत सुविधांचा विकास करणे गरजेचे आहे. यापूर्वी आसाम-अरुणाचल प्रदेशातील लोहित नदीवरचा 9.15 किलोमीटरचा भुपेन हजारिका सेतू हा देशातील सर्वात मोठा पूल होता. या सेतूने 35 वर्षांपूर्वीच्या पाटणा-हाजीपूरला जोडणार्‍या 5.75 किलोमीटर लांबीच्या गांधी सेतूचा विक्रम मोडला. देशातील सर्वात लांब असणार्‍या पुलात सर्वाधिक लांबीचे चार पूल बिहारमध्ये आहेत. चारही गंगा नदीवर आहेत. बिहारमध्ये गांधी सेतूने दीर्घकाळापर्यंत लाईफलाईनप्रमाणे काम केले.

आता मुंबईचा अटल सेतूही लाईफलाईन ठरणार आहे. वास्तविक, पाच वर्षांपूर्वी मुंबईत तयार झालेला वांद्रे वरळी सी लिंक हाही देशाच्या व्यावसायिक राजधानीचे बलस्थान बनला. वाढत्या वाहतुकीमुळे अशा प्रकारचे लहान-मोठे पूल ही देशाची गरज आहे. ज्या शहरांतून नद्या वाहतात, तेथे पूल तर आणखी महत्त्वाचे ठरतात. वास्तविक, राष्ट्रीय राजधानी क्षेत्राचा विचार केला, तर सहापेक्षा अधिक पूल असतानाही वाहतूक कोंडी नियत्याचीच बनली आहे. नदी, समुद्र, सरोवर किंवा घनदाट वस्ती, कोंडी यापासून वाचण्यासाठी पूल उभारणी करणे हा बोगदानिर्मितीप्रमाणेच चांगला पर्याय आहे.

गेल्या काही वर्षांत भारतात पायाभूत सुविधांचा विकास वेगाने होत आहे. रस्त्यांचे जाळे विस्तारत आहे. दिल्ली आणि मुंबईदरम्यान एक्स्प्रेस वे तयार होत आहे. हा प्रवास 12 तासांतच पूर्ण होणार आहे. उत्तर प्रदेशचा विचार केला, तर दिल्ली ते जौनपूरपर्यंत तीन तीन एक्स्प्रेस वे आहेत आणि गंगा एक्स्प्रेस वे तयार होत आहेत. दीड अब्ज लोकसंख्येच्या देशात पायाभूत वेगवान विकासासाठी रस्ते अणि पुलांचे जाळे असणे गरजेचे आहे. भारताची दुसरी बाजू म्हणजे पूल आणि एक्स्प्रेस वेकडे अधिक लक्ष देऊन आपण अन्य लहानसहान मार्गांकडे दुर्लक्ष करत नाही ना, महामार्ग तयार करण्याच्या नादात ग्रामीण भागाला जोडणार्‍या रस्त्यांची वाताहत तर होत नाही ना, हे पाहिले पाहिजे. त्याचवेळी महामार्गावरचा वाचणारा वेळ हा या रस्त्यांवर वाया जात आहे का? एकूणच सर्वात मोठा सेतू हा जनतेच्या सेवेत दाखल होत असताना देशातील सर्व पूल, रस्ते आणि मार्गांची गुणवत्ताही तपासायला हवी.

SCROLL FOR NEXT