Latest

Asian Games Badminton : ‘गोल्ड मेडल’ सामन्यात भारताची चीनवर 2-0 ने आघाडी

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : Asian Games Badminton : भारतीय पुरुष बॅडमिंटन संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेत ऐतिहासिक पहिले सुवर्णपदक जिंकण्याचा निर्धार केला आहे. त्याच दिशेने संघाच्या खेळाडूंनी वाटचाल केली आहे. फायनलमध्ये बलाढ्य चीनशी सामना सुरू असून पहिल्या सामन्यात लक्ष्य सेनने एकेरीमध्ये शी यु चा पराभव केला तर दुसऱ्या सामन्यात दुहेरीत सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीने योंग डुओ लियांग आणि वेन चेंग यांचा पराभव करून भारताला चीनवर 2-0 अशी आघाडी मिळवून दिली. तिसऱ्या सामन्यात भारताच्या किदाम्बी श्रीकांतचा एकेरीत शिफेंग लीशी सामना सुरू आहे.

दुसऱ्या सामन्यात चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज रँकीरेड्डी यांचा सामना पुरुष दुहेरीत योंग डुओ लियांग आणि वेंग चेंग यांच्याशी झाला. चिराग-सात्विकने पहिला गेम 21-15 असा सहज जिंकला. या सामन्यात भारतीय जोडीने वर्चस्व राखले आणि चीनच्या जोडीला गुण मिळवू दिले नाही. यानंतर चिराग-सात्विकने दुसरा गेमही 21-18 असा जिंकला. अशा प्रकारे या दोघांनी भारताला चीनवर 2-0 अशी आघाडी मिळवून दिली.

पहिल्या सामन्यात लक्ष्य सेनचा विजय

पहिल्या सामन्यात लक्ष्य सेन आणि शी यु आमनेसामने आले होते. ज्यात लक्ष्य सेनने बाजी मारली आणि भारतीय संघाला या सुवर्ण पदकाच्या लढतीत 1-0 ने आघाडी मिळवून दिली. आता पुढचा सामना पुरुष दुहेरीचा खेळवला जात आहे.

लक्ष्य आणि शी यु यांच्यात पहिल्या गेममध्ये चुरस पहायला मिळाली. लक्ष्यने पहिला गेम 22-20 असा जिंकला. यानंतर शी युचीने जबरदस्त पुनरागमन केले. ज्यामुळे भारतीय खेळाडू बॅकफुटवर गेला. शी यु ने हा गेम 21-14 असा जिंकून सामन्यात बरोबरी साधली. यानंतर तिसऱ्या आणि निर्णायक गेममध्येही चीनी खेळाडूने लक्ष्यवर दबाव टाकत मोठी आघाडी मिळवली. लक्ष्य एका वेळी 13-9 असा पिछाडीवर होता. यानंतर भारतीय खेळाडूने झुंझार खेळ करत गुणसंख्या 16-16 अशी बरोबरीत आणली. यानंतर लक्ष्यने शी युला पुनरागमन करण्याची संधी दिली नाही आणि हा गेम 21-18 ने जिंकला. याचबरोबर त्याने हा सामना जिंकला.

लक्ष्य सेन, किदाम्बी श्रीकांत आणि मिथुन मंजुनाथ भारताकडून एकेरीत मैदानात उतरतील. त्याचवेळी दुहेरीत चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज रंकीरेड्डी, साई प्रतीक आणि ध्रुव कपिला ही जोडी आव्हान देणार आहे. चीनकडून शी युची, ली शिफेंग आणि वेन हाँग यान हे एकेरीत खेळतील. तर दुहेरीत योंग डुओ लिआंग आणि वेंग चेंग, लियू युचेन आणि ओउ झुआनी यांचे आव्हान असेल. भारताचा नंबर वन बॅडमिंटनपटू एचएस प्रणॉय पाठीच्या दुखापतीमुळे चीनविरुद्धचा अंतिम सामना खेळणार नाही.

भारतीय पुरुष बॅडमिंटन संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेत आजपर्यंत कधीही सुवर्णपदक जिंकलेले नाही. या स्पर्धेत भारताने 1974, 1982 आणि 1986 मध्ये केवळ कांस्यपेक्षा पदक जिंकले आहे. भारतीय संघाने सुवर्णपदक जिंकल्यास 61 वर्षात प्रथमच संघ सुवर्णपदकावर नाव कोरण्यात यशस्वी होईल. पुरुष बॅडमिंटन सांघिक स्पर्धा 1962 पासून आशियाई खेळांमध्ये खेळली जात आहे.

शनिवारी झालेल्या चुरशीच्या लढतीत भारतीय पुरुष संघाने दक्षिण कोरियाचा 3-2 असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. एचएस प्रणॉयने जिओन ह्योक जिनचा 18-21, 21-16, 21-19 असा पराभव करत 1-0 अशी आघाडी घेतली होती. मात्र त्यानंतर सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांचा सेओंग-मिन जोडीने 13-21, 24-26 असा पराभव केला. यानंतर लक्ष्यने ली यंग्यूचा 21-7, 21-9 असा पराभव केला. अर्जुन-ध्रुव कपिला जोडीला किम-सुंगसेंगकडून 16-21, 11-21 असा पराभव पत्करावा लागला, परंतु निर्णायक सामन्यात किदाम्बी श्रीकांतने चो जियोंगयापचा 12-21, 21-16, 21-14 असा पराभव करून भारताला विजय मिळवून दिला.

SCROLL FOR NEXT