पुढारी ऑनलाईन डेस्क : आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंची शानदार कामगिरी कायम आहे. शुक्रवारी सांयंकाळी किरण बालियान हिने शॉटपुट अर्थात गोळाफेक स्पर्धेत कांस्यपदक पटकावले. तिने तिसऱ्या प्रयत्नात 17.36 मीटर लांब गोळाफेक करून पदकावर नाव कोरले. 24 वर्षीय भारतीय ॲथलीटने सप्टेंबरच्या सुरुवातीला भारतीय जीपी 5 मध्ये 17.92 मी. ची वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी केली होती.
आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्ण आणि रौप्य पदक अनुक्रमे चीनच्या लिजियाओ गोंग आणि जियायुआन सॉन्ग यांनी जिंकले. लिजियाओ गोंगने 19.58 मीटर तर जियायुआन सॉन्गने 18.92 मीटर फेक केली.
अॅथलेटिक्स अर्थात ट्रॅक आणि फील्डमध्ये भारताचे हे पहिले पदक आहे. मेरठच्या किरण बालियानने ट्रॅक आणि फील्डमध्ये भारताचे खाते उघडले आहे. सध्या भारताची एकूण पदकांची संख्या आता 33 झाली आहे. यामध्ये आठ सुवर्ण, 12 रौप्य आणि 13 कांस्य पदकांचा समावेश आहे.
महिलांच्या शॉटपुटमध्ये भारताचे अखेरचे पदक 1951 मध्ये नवी दिल्ली येथे उद्घाटनाच्या आशियाई स्पर्धेत मिळाले होते. तेव्हा बार्बरा वेबस्टरने कांस्यपदक जिंकले होते.