पुढारी ऑनलाईन डेस्क : Asian Games 2023 : चीनमधील हांगझोऊ येथे सुरू असलेल्या 19व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंची शानदार कामगिरी कायम आहे. शुक्रवारी महिला स्क्वॉशमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या जोश्ना चिनप्पा, तन्वी खन्ना आणि अनाहत सिंग यांना उपांत्य फेरीच्या सामन्यात हाँगकाँगकडून 1-2 ने पराभवाला सामोरे जावे लागले. याचबरोबर हाँगकाँगने अंतिम फेरी गाठली आणि आपले रौप्यपदक निश्चित केले. या पराभवामुळे भारताला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले आहे.
तन्वीला सुरुवातीच्या सामन्यात चॅन सिन युककडून 0-3 (6-11, 7-11, 3-11) असा पराभव पत्करावा लागला, तर जोशनाने पाच गेमचा थरार 3-2 (7-11, 11-7, 9-11, 11-6, 11-8) असा जिंकला आणि बरोबरी साधली. त्यानंतर, 15 वर्षीय अनाहतने अंतिम सामन्यात आपली क्षमता दाखवली आणि ली का यी विरुद्धच्या तिसऱ्या गेममध्ये नेत्रदीपक पुनरागमन केले, परंतु ते पुरेसे ठरले नाही आणि तिला 0-3 असा पराभव पत्करावा लागला. यासह भारताच्या एकूण पदकांची संख्या 32 झाली. यामध्ये 8 सुवर्ण, 12 रौप्य आणि 12 कांस्यपदकांचा समावेश आहे. (Asian Games 2023)