Latest

Gyanvapi Survey | ज्ञानवापी मशिदीचे तळघर उघडले! मूर्ती, त्रिशूल अन् भिंतींवर आढळल्या कमळाच्या खुणा?

दीपक दि. भांदिगरे

वाराणसी, पुढारी ऑनलाईन : ‍‍‍‍वाराणसीतील ज्ञानवापी मशिदीचे आज शनिवारी देखील सर्वेक्षणाचे काम सुरु आहे. भारतीय पुरातत्त्व विभाग हे सर्वेक्षणाचे काम करत आहे. या सर्वेक्षणातील पथकात ६० जणांचा समावेश आहे. मशिदीतील वजूखाना सोडून अन्य ठिकाणांचे पुन्हा सर्वेक्षण केले जात आहे. शुक्रवारच्या सर्वेक्षणाच्या पहिल्या दिवशी मशिद परिसराचे मोजमाप घेण्यात आले. याशिवाय ४१ सदस्यांच्या पथकाने भिंती आणि त्याच्या आजूबाजूच्या भागातून पुरावे गोळा केले आहेत. शनिवारी रेडिएशनद्वारे सर्वेक्षणाचे काम पुढे नेण्यात येत आहे. (Gyanvapi Survey)

अधिक मिळालेल्या माहितीनुसार, प्रशासनाच्या मध्यस्थीनंतर ज्ञानवापी मशिदीचे तळघर खुले करण्यात आले आहे. एएसआयची टीम तळघरात गेली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तळघरात ४ फूट मूर्ती, दोन फूट त्रिशूल सापडल्याचा दावा हिंदू पक्षाकडून करण्यात आला आहे. यासोबतच पाच कलशही सापडले आहेत. तळघरातील भिंतींवर कमळाच्या खुणा आढळल्या आहेत. येथे सापडलेल्या मूर्तीचा कालखंड तपासला जात आहे.

हिंदू पक्षाच्या वकिलांनी सांगितले की ज्ञानवापी परिसराचे इमेजिंग आणि मॅपिंगचे काम करण्यात आले आहे. एएसआयचे पथक आपले काम करत आहेत. सर्वोच्च न्यायालयाने मशिदीच्या सर्वेक्षणाला परवानगी दिली आहे. हे अत्यंत वैज्ञानिक पद्धतीचे सर्वेक्षण आहे. मशिदीच्या स्ट्रक्चरच्या आत नेमके काय आहे हे यातून समजणार आहे? हे किती जुने आहे? हे बांधकाम औरंगजेबाच्या काळात झाले आहे का? हेदेखील यातून समोर येणार आहे. दोन दिवसांपासून सर्वेक्षणाचे काम सुरू आहे.

पश्चिमेकडील भिंतीवर सर्वेक्षण

ज्ञानवापी मशिदीतून बाहेर आल्यानंतर मुस्लिम पक्षाचे वकील मुमताज अहमद यांनी सांगितले की, 'आम्ही एएसआयच्या सर्वेक्षणावर समाधानी आहोत. आम्ही त्यांना सर्वेक्षणासाठी सहकार्य करु. ज्ञानवापी परिसरात जिथे चावीची गरज आहे, तो भाग अंजुमन इंतजामिया मशिद समितीकडून खुला केला जाईल. पण चावी सुपूर्द केली जाणार नाही. अजून एकही तळघर उघडलेले नाही. पश्चिमेकडील भिंतीवर सर्वेक्षण सुरू असून मला न्यायालयात जावे लागणार असल्याने आम्ही बाहेर पडलो.'

आज शनिवारी होणाऱ्या सर्वेक्षणात मुस्लिम पक्षाच्या ताब्यातील तळघरही उघडण्यात येणार आहे. मुस्लीम पक्ष आज पहिल्यांदाच सर्वेक्षणात सहभागी होणार आहे. बराच काळ बंद असल्याने तळघर अगोदर स्वच्छ केले जाणार आहे. त्यानंतर त्याची लांबी आणि रुंदी मोजली जाणार आहे. (Gyanvapi Survey)

ज्ञानवापी मशिद परिसरातील ASI सर्वेक्षणाबाबत मुस्लिम पक्षाला मोठा धक्का देत सर्वोच्च न्यायालयाने त्यांची याचिका काल फेटाळली होती. ज्ञानवापी परिसरात एएसआय सर्वेक्षणाचे काम सुरूच राहणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. यावेळी सर्वोच्च न्यायालयात दोन्ही बाजूंकडून जोरदार युक्तिवाद झाला. या सुनावणीदरम्यान, मुस्लिम पक्षाच्या बाजूच्या युक्तिवादावर, सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड म्हणाले की, अयोध्या प्रकरणात एएसआय सर्वेक्षणदेखील केले गेले होते आणि आम्ही पुराव्याचे सर्व पर्याय खुले ठेवू.

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.