Latest

अश्‍विनी बिद्रे प्रकरण : मृतदेहाची विल्हेवाट लावेपर्यंत कुरुंदकरने नाईट राऊंड केलाच नाही

स्वालिया न. शिकलगार

नवी मुंबई : पुढारी वृत्तसेवा

सहायक पोलिस निरीक्षक अश्‍विनी बिद्रे यांची हत्या झाली तेव्हापासून त्यांच्या मृतदेहाची विल्हेवाट लावेपर्यंत मुख्य आरोपी अभय कुरुंदकर याने नाईट राऊंड केलाच नाही हे न्यायालयामध्ये शुक्रवारी दुसर्‍यांदा सिद्ध झाले. पोलिस उपनिरीक्षक नरेंद्र कोरे यांनी पनवेल येथील न्यायालयात दिलेल्या साक्षीमुळे यावर शिक्‍कामोर्तब झाले आहे.

अभय कुरुंदकर याने आपल्या मीरा रोडमधील घरांमध्ये 11 एप्रिल 2016 रोजी बिद्रे यांची हत्या केली. त्यानंतर दुसर्‍या दिवशी त्याने आणि इतर आरोपींनी अश्‍विनी यांच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली. 13 एप्रिल रोजी पहाटे अश्‍विनी यांचा मृतदेह वसई खाडीमध्ये फेकला. या कालावधीत आपण रात्रीच्या गस्तीवर होतो, असा बनाव कुरुंदकर याने केला होता. मात्र या कालावधीत कुरुंदकर रात्रीच्या गस्तीवर नव्हताच, अशी साक्ष पोलिस उपनिरीक्षक नरेंद्र कोरे यांनी जिल्हा सत्र न्यायाधीश माधुरी आनंद यांच्या न्यायालयात दिली.

अश्‍विनी यांची हत्या झाली, त्यावेळी कोरे हे पोलिसांच्या काशिमिरा युनिटमध्ये काम करत होते. या युनिटकडे दोन गाड्या होत्या. त्यापैकी एका गाडीचा वापर कुरुंदकरने रात्रीच्या गस्तीसाठी केलेला नाही हे यापूर्वीच सिद्ध झाले होते. दुसर्‍या गाडीचाही त्याने रात्रीच्या गस्तीसाठी वापर केला नाही हे शुक्रवारी सिद्ध झाले.

विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी कोरे यांची सरतपासणी तर आरोपींच्या वकिलांनी त्यांची उलटतपासणी घेतली. यावेळी न्यायालयामध्ये अश्‍विनी यांचे पती राजू गोरे, सहायक पोलिस आयुक्‍त संगीता अल्फान्सो आणि नवी मुंबई गुन्हे शाखेचे अधिकारी उपस्थित होते. या खटल्याची पुढील सुनावणी येत्या 18 फेब्रुवारी रोजी होणार आहे.

एमटीएनएलच्या अधिकार्‍यांना वॉरंट

एमटीएनएलचे नोडल अधिकारी धोतरे हे शुक्रवारी झालेल्या सुनावणीसाठी न्यायालयात हजर राहिले नाही. त्यामुळे त्यांच्या विरोधात वॉरंट काढण्यात यावा, अशी मागणी विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी केली. त्यानुसार त्यांच्याविरोधात वॉरंट काढण्याच्या सूचना न्यायालयाने दिल्या.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT