Latest

कोल्हापूर : संत बाळूमामाच्या बकऱ्यांच्या तळावर आषाढी यात्रा उत्साहात; हजारो भाविकांची उपस्थिती

अनुराधा कोरवी

मुदाळतिट्टा; पुढारी वृत्तसेवा : 'बाळूमामाच्या नावानं चांगभलं'चा जयघोष करीत 'बोला पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम' च्या नाम घोषात महाराष्ट्र कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र आदमापूर येथील संत बाळूमामा यांच्या बकऱ्यांच्या तळावर आषाढी एकादशी यात्रा मोठ्या भक्तीभावाने साजरी करण्यात आली. महाराष्ट्र राज्यातील एकूण १८ ठिकाणी हजारो भक्तांच्या मांदियाळीत, हरीनामाचा गजर करीत ही आषाढी यात्रा संपन्न झाली. आदमापूर येथील बाळूमामा मंदिरात आषाढी एकादशी निमित्त हजारो भाविकांनी श्रींचे दर्शन घेतले.

आदमापूर येथील बाळूमामा देवस्थानची बत्तीस हजार बकरी सध्या महाराष्ट्रात फिरत आहेत. बाळूमामा विठ्ठल भक्त पंढरपूर येथे विठ्ठलाच्या दर्शनासाठी जात होते. त्यामुळेच बाळूमामा मंदिरात त्यांच्या मूर्ती शेजारी विठ्ठल- रुक्मिणीची मूर्ती बसवण्यात आली आहे. प्रत्येक एकादशीला आदमापूर येथून भाविक पंढरपुरात दाखल होतात आणि येताना पाण्याचा कलश आणतात. त्या पाण्यात बाळूमामा यांच्या समाधीला जलाभिषेक घालतात. भाविकांनी चालू केलेली ही प्रथा आजही सुरूच आहे. बाळूमामाच्या बकऱ्यांच्या तळावर भाविकांची होणारी गर्दी ही लक्षवेधी ठरत आहे. बकऱ्यांच्या तळावर अनेक ठिकाणी किर्तन, प्रवचन, धनगरी ढोल वादन, भजन अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

लोहा (जि. नांदेड), ढोलबारे (ता. सटाणा, जि. नाशिक), पिंपळगाव ( ता .पैठण, जि. छ. संभाजीनगर), खटकेवस्ती (ता. फलटण , जि. सातारा), लाटवाडी ( ता. शिरोळ, जि. कोल्हापूर), औरनाळ (ता. गडहिंगलज), पेठ वडगाव ( आष्टा), गिरगाव ( ता. वसमत, जि. हिंगोली), खडकी ( बाळूमामा मंदिर, ता. दौंड जि.पुणे), माजलगाव ( जि. बीड), पेनुर (ता. मोहोळ, जि. सोलापूर), जानवळ (ता. चाकोर, जि. लातूर ), वांबोरी ( शनिशिंगणापूर, जि.अहमदनगर), बावची ( ता. वाळवा, जि. सांगली ) महादेव नगर (ता. इंदापूर , जि.पुणे), रांजणगाव सांदस (ता.शिरूर , जिल्हा – पुणे), सोणके, पंढरपूर तिसंगी , (ता. पंढरपूर) अशा ठिकाणी ही आषाढी यात्रा मोठ्या उत्साही वातावरणामध्ये संपन्न झाली.

आषाढीमधून सर्वधर्मसम भावाची शिकवण

बकऱ्यांचा स्थळ आमच्या गावात असावा यासाठी तेथील ग्रामस्थ पुढाकार घेत असत. आषाढी एकादशीसाठी लागणारा सर्व खर्च भाविक आपल्या गावातून पंचक्रोशीतून वर्गणी जमा करून करत आहेत. लाखोंची उलाढाल या ठिकाणी होत आहे. नामवंत कीर्तनकाराची कीर्तने तर सेवा म्हणूनच संपन्न होत आहेत. कोणी काय दिलं यापेक्षा कोणी काय केले याला महत्त्व आहे. बाळूमामाच्या या आषाढीमधून सर्वधर्मसमभावाची शिकवण दिली जाते.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT