Latest

Ashadhi Wari 2023 : पालखी मार्गांवर सुविधा पुरवा; पुणे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पालखीमार्गांवर आरोग्य सुविधा, पुरेसा औषधसाठा, फिरत्या शौचालयांची व्यवस्था, पाणी, वीज आदी सर्व सुविधा प्राधान्याने पुरवण्यात याव्यात. उन्हाचा त्रास वारकरी भाविकांना होऊ नये, यासाठी आवश्यक त्या औषधांची व्यवस्था ठेवावी, पुरेसा पिण्याचा पाण्याचा पुरवठा करण्यास प्राधान्य द्या, वारकर्‍यांना कोणत्याही असुविधांना तोंड द्यावे लागू नये, याची दक्षता प्रशासनाने घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले आहेत.

संत ज्ञानेश्वर महाराज पालखीच्या अनुषंगाने जिल्हाधिकार्‍यांनी हवेली, तसेच पुरंदर तालुक्यातून जाणार्‍या पुणे-सासवड-जेजुरी-निरा या पालखीमार्गाला व पालखीतळ, विसाव्यांच्या ठिकाणांना भेटी देऊन तेथील तयारीचा आढाला घेतला. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल, हवेलीचे प्रांताधिकारी संजय आसवले, दौंड- पुरंदर उपविभागीय अधिकारी मिनाज मुल्ला, श्री संत ज्ञानदेव महाराज देवस्थान आळंदीचे पदाधिकारी, हवेलीचे तहसीलदार किरण सुरवसे, राष्ट्रीय महामार्गाचे कार्यकारी अभियंता अभिजित औटी आदी उपस्थित होते.

पालखीमार्गाच्या साईडपट्ट्या भरून घेण्यासह खड्डे, तसेच पाणी साचणार्‍या ठिकाणी मुरूम व अन्य पर्यायांचा वापर करून डागडुजी करावी. पालखी विसावा, मुक्काम असलेल्या गावातील पिण्याच्या पाणी योजनांसाठी अतिरिक्त राखीव पंप ठेवावेत. टँकर वाढवावेत. ऐनवेळी तांत्रिक अडचणी येऊ नयेत म्हणून पर्यायी व्यवस्था तयार ठेवावी.

मार्गात आवश्यक तेथे पाण्याच्या टाक्या ठेवाव्यात. दिवे घाटाचा टप्पा पार केल्यानंतर झेंडेवाडी विसाव्याच्या ठिकाणी वारकर्‍यांना मोठा विसावा घ्यावा लागतो. त्या ठिकाणी वारकर्‍यांना विसावा घेता यावा, यासाठी पुरेशी जागा उपलब्ध व्हावी म्हणून प्रशासनाने शेजारील खासगी जमीनधारकांशी संपर्क साधून व्यवस्था करावी, असे निर्देश प्रशासनाला दिले आहेत.

डॉ. देशमुख यांनी सासवडजवळील बोरावके मळा विसावा, वाल्हे पालखीतळ, निरा पालखी विसावा स्थळ पाहणी केली. निरा नदीवरील पुलाच्या संरक्षक कठड्यांची दुरुस्ती तत्काळ करून घ्या. हवेली तालुक्यात उरुळी देवाची पोलिस ठाण्याजवळील विसाव्याच्या ठिकाणाची डागडुजी करून घ्या. वडकी विसावा येथे स्थायी स्वरूपात उभारण्यात आलेल्या सिमेंट काँक्रीट स्टेजचीही जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी पाहणी केली.

घाटात कचरा टाकणार्‍यांवर कारवाई

दिवे घाटामध्ये कचरा टाकण्यात येत असल्याच्या तक्रारींच्या अनुषंगाने घाटामध्ये गस्त घालण्यात यावी. असे प्रकार आढळून आल्यास कठोर कारवाई करण्यात यावी, असे निर्देशही डॉ. देशमुख यांनी दिले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT