Latest

Ashadhi Ekadashi Mahapuja : अहमदनगरचे काळे दाम्पत्य ठरले मानाचे वारकरी; मुख्यमंत्र्यांसह केली विठ्ठलाची महापूजा

मोहन कारंडे

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा : आषाढी एकादशीच्या मुख्य सोहळ्यानिमित्त पंढरपुरात श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा मोठ्या उत्साहात व चैतन्यमय वातावरणात संपन्न झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत मानाचे वारकरी म्हणून शेतकरी कुटुंबातील भाऊसाहेब मोहनीराज काळे व मंगल भाऊसाहेब काळे (मु.पो. वाकडी, ता. नेवासा, जि. अहमदनगर) या वारकरी दांपत्यास शासकीय पूजेचा मान मिळाला.

काळे दांपत्य गेल्या २५ वर्षांपासून भास्करगिरी महाराज यांच्या सोबत देवगड ते पंढरपूर पायी वारी करीत आहेत. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेचा मान मिळालेल्या वारकरी दांपत्यास एक वर्षासाठी मोफत प्रवासाची सेवा दिली जाते. त्या मोफत पासचे वितरण मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते या वारकरी दांपत्यास करण्यात आले.

यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, प्रताप जाधव, आमदार समाधान आवताडे, भरत गोगावले, मंगेश चव्हाण, बबनराव पाचपुते, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे आदी उपस्थित होते.

निर्मल दिंडी पुरस्काराचे वितरण

वारीत सहभागी होणाऱ्या अनेक दिंड्या सामाजिक प्रबोधनाचे कार्य करत असतात. या दिंड्यांचा आदर्श घेऊन 'निर्मल वारी हरित वारी' अभियानामध्ये नागरिकांचा सहभाग वाढवावा, या उद्देशाने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती यांच्यामार्फत 'श्री विठ्ठल निर्मल दिंडी' पुरस्कार देण्यात येतो. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. प्रथम क्रमांकाचे पारितोषिक श्री तारकेश्वर गड दिंडी, ता. आष्टी, जि. बीड (एक लाख रुपये व सन्मानचिन्ह), द्वितीय क्रमांक नांदेडकर मंडळीची दिंडी, ता. हवेली, जि. पुणे (७५ हजार व सन्मान चिन्ह) तर तृतीय क्रमांकाचे पारितोषिक श्री एकनाथ महाराज वारकरी शिक्षण संस्था, यशवंतनगर, पैठण जिल्हा औरंगाबाद (५० हजार व सन्मान चिन्ह) या दिंडीला प्रदान करण्यात आले.

यावेळी भूवैकुंठ या वारीसंदर्भातील छायाचित्र पुस्तकाचे तसेच 'आरोग्यदूत' या पुस्तिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी औसेकर महाराज यांनी प्रास्ताविक केले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT