Latest

पोटात पाणी होणे, जाणून घ्या ‘जलोदर’ची लक्षणे आणि उपाय

अनुराधा कोरवी

पोटात पाणी होणे याला 'जलोदर' किंवा 'पाणथरी' असे म्हणतात. हा आजार तुलनेने कमी प्रमाणात आढळतो. मात्र, उद्भवल्यानंतर तो माणसाला त्रासदायक ठरणारा असतो. यामध्ये संबंधित व्यक्तीचे पोट फुगते. तपासणीमध्ये पोटात पाणी झाल्याचे आढळून येते. हे पाणी कृत्रिमरीत्या काढता येते. मात्र, काही दिवसांनी पाणी पुन्हा वाढू शकते. या आजाराचे प्रमाण तुलनेने कमी असल्यामुळे याबाबत लोकांना फारशी माहिती नाही.

आयुर्वेदामध्ये या आजारावर चांगले उपाय उपलब्ध आहेत. परंतु, बरेचजण शेवटचा उपाय म्हणून आयुर्वेदिक उपचारांकडे बघतात; पण आजार बळावण्यापूर्वी योग्य ते आयुर्वेदिक उपाचर केले, तर हा आजार नक्कीच बरा होऊ शकतो. उशीर झाल्यास उपचाराचा कालावधी वाढतो. उपचार वेळेवर करून घ्यावेत यासाठी आजाराची माहिती असणे आवश्यक असते.

जलोदर होण्याची प्रमुख कारणे

उष्ण, खारट, मसालेदार, चमचमीत, आंबट अशा पदार्थांचे खूप जास्त प्रमाणात आणि वारंवार सेवन करणे.

पचनसंस्था कमकुवत असतानाही पचावयास जड असे पदार्थ खाणे.

अतिमद्यपान, बद्धकोष्ठता याकडे दुर्लक्ष करणे.
उलट्या, जुलाबाच्या आजारानंतर त्वरित जड भोजन घेण्यास सुरुवात करणे.

मूळव्याध, कोलायटीस, गॅसेस याकडे दुर्लक्ष करणे.

नैसर्गिक क्रिया अडवून धरणे यांसारख्या कारणांमुळे जलोदर हा आजार होतो.

लिव्हर सिरॉयसीस, हिपॅटायटीस, लिव्हर फेल्युअर या लिव्हरच्या आजारांमुळे हृदय विकार, किडनी विकार तसेच अपघातामुळे किंवा शस्त्रक्रियेनंतर जंतुसंसर्ग झाल्यास जलोदर होण्याची शक्यता असते. काही वेळा लहान मुलांमुळे कुपोषणामुळेही हा आजार होतो.

आजाराची प्रमुख लक्षणे कोणती?

सुरुवातीच्या अवस्थेमध्ये पोट फुगल्याप्रमाणे वाटू लागते. पोटाचा आकार वाढू लागतो, भूक कमी होते, पोट साफ होत नाही, जड असल्यासारखे वाटते, अशक्तपणा वाटतो, उत्साह वाटत नाही, हात पाय बारीक होऊ लागतात, हळूहळू ही लक्षणे वाढू लागतात. पोटात पाणी साठून ते आणखी मोठे होते. त्वचा ताणलेली दिसू लागते.

कालांतराने ही लक्षणे वाढत जातात. पोटात पाणी साठून ते आणखी मोठे होते, दम लागतो. अनेक वेळा रक्ताचे प्रमाण कमी झालेले दिसते. लिव्हरचा विकार असल्यास त्यासोबत काही वेळा कावीळही आढळते, तोंडाला कोरड पडते, सहनशक्ती कमी झालेली असते.

उपचार कोणते आहेत?

आयुर्वेदिक शास्त्रानुसार हा उपचाराला कठीण असा आजार आहे. मात्र, योग्य वेळी उपचार करून घेतले असता आणि त्यामध्ये नियमितता राखली तर नक्कीच या त्रासापासून मुक्त होता येते. तसेच अतिजास्त वाढलेले पाणी आधुनिक पद्धतीने काढून टाकताना सोबत आयुर्वेदिक उपचार केले, तर आजाराचे प्रमाण लवकर कमी होण्यास नक्कीच मदत होते.

या आजारामध्ये जुलाब देऊन पोट साफ ठेवणे हा महत्त्वाचा उपचार करावा लागतो. अर्थात पोटाची स्थिती कशी आहे यावर मृदू, मध्यम, तीव्र रेचन नियमितपणे दिले जाते. या उपचारानंतर अशक्तपणा न येता उत्साह वाटतो. तक्रारी, अस्वस्थता कमी होते आणि ताजेपणा जाणवतो. आयुर्वेदाने उदराचे वात, पित्त, कफ, प्लीहोदर, यकृतदर, दुष्योदर, दकोदर असे वेगवेगळे प्रकार सांगितले आहेत. यापैकी कोणता प्रकार झालेला आहे हे तपासून त्यानुसार औषधांचा वापर केला जातो. एरंडेल, सुंठ, हिरडा, दशमुखी, आरग्वध, कडुनिंब, पिंपळी, रोहिडा, सरफंगा, कोरफड इत्यादी वनस्पती, औषधे, ताम्रभस्म, मंडूरभस्म, काही क्षार तसेच गोमूत्र असणारी अनेक औषधे वेगवेगळ्या प्रकारात दिली जातात.

ही औषधे सुरू केल्यानंतर पाणी कमी होऊ लागल्यावर पोटाला लगेचच तीळतेल, एरंडेल लावून घट्ट पोटपट्टा बांधणे अतिशय महत्त्वाचे असते. तसेच पाणी जास्त झाल्यास पाणी काढल्यानंतरही लगेच पोटपट्टा बांधण्यास विसरू नये.

आयुर्वेदानुसार ज्यांना हा आजार झालेला आहे त्या माणसाने फक्त दुधावर राहावे, असे सांगितले आहे. पोटातील पाणी कमी झाल्यानंतर देखील जास्तीत जास्त दुधाचा वापर करावा. पुन्हा हा त्रास उद्भवू नये यासाठी मऊ भात, मुगाची खिचडी, ताजे गोड ताक, मुगाचे वरण, हुलग्याचे कढण, गरम पातळ भाकरी, पडवळ, शेवगा, कारले, लसूण, कांदा, भाज्या अल्प प्रमाणात चालू शकतात.

कष्टाची कामे, जागरण, व्यायाम, दिवसा झोप पूर्ण टाळून विश्रांती घ्यावी. त्याचप्रमाणे दही, केळी, अंडी, मासे यासारखे पदार्थ पूर्णपणे वर्ज्य करावेत. हा आजार झाला म्हणून घाबरून न जाता तज्ज्ञांच्या सहाय्याने योग्य उपचार केला, तर नक्कीच चांगला परिणाम दिसून येतो.

SCROLL FOR NEXT