Latest

राधानगरीसह काळम्मावाडी धरण क्षेत्रात पावसाची सलामी

Arun Patil

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : राधानगरी, काळम्मावाडी धरण क्षेत्रात गुरुवारी दमदार पाऊस झाला. राधानगरी धरण परिसरात 18 मि. मी. पावसाची नोंद झाली. दोन दिवसांत मान्सून जिल्हा व्यापण्याची शक्यता आहे. शनिवार, दि. 24 पासून तीन दिवस जिल्ह्यात चांगला पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

जिल्ह्यात जून महिन्याचे पहिले तीन आठवडे कोरडे गेले आहेत. अखेरच्या आठवड्याच्या प्रारंभी पावसाने जिल्ह्याच्या पश्चिम भागात विशेषत: राधानगरी, काळम्मावाडी धरण क्षेत्रात गुरुवारी हजेरी लावली. राधानगरी धरण परिसरासह दाजीपूर, आसने आदी भागांत दमदार पाऊस झाला. राधानगरीत 18 मि. मी. पाऊस झाला.

दाजीपूर परिसरात 16 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. काळम्मावाडी धरण परिसरातही पाऊस सुरू झाला आहे. आजरा तालुक्यातही काही भागांत पाऊस झाला. जिल्ह्यात पावसाने हजेरी लावल्याने गेल्या अनेक दिवसांपासून आभाळाकडे डोळे लावून बसलेला बळीराजा काहीसा सुखावला आहे. आज जिल्ह्यात पाऊस होईल. दि. 24 ते दि.26 या तीन दिवसांत जिल्ह्यात पावसाचा जोर वाढेल, असाही अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

राधानगरी धरण परिसरात दमदार आगमन

राधानगरी / पुढारी वृत्तसेवा : राधानगरी धरण परिसरात गुरुवारी दुपारनंतर पावसाचे दमदार आगमन झाले. धरण परिसरात 18 मिलिमीटर, तर दाजीपूर परिसरात 16 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तालुक्यात काही ठिकाणी तुरळक पाऊस झाला.

पावसाने दडी मारल्याने पिके करपू लागली आहेत. तालुक्यातील भात पेरण्या वाया गेल्या. आता दुबार पेरणीसाठीही पाऊस नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. पिण्याचे पाणी, चार्‍याचा प्रश्न गंभीर बनला आहे. दुबार पेरणीची तयारी केली; परंतु त्यासाठीही पाऊस नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे. शेतीसाठी मोठ्या पावसाची गरज आहे.

आजरा तालुक्यातील घाटमाथ्यावरील गावात मुसळधार

गवसे, पुढारी वृत्तसेवा : आजरा तालुक्यातील घाटमाथ्यावरील किट्टवडे, आंबाडे, लिंगवाडी, घाटकरवाडी, धनगरमोळा, सुळेरान या गावांत मुसळधार पावसाने हजेरी लावली.

पावसाने हुलकावणी दिल्याने दुबार पेरणीचे संकट आले होते. पाण्याचा प्रश्न गंभीर बनला होता. ज्याठिकाणाहून पावसाचे आगमन होते, त्या गावांतदेखील पाऊस झाला नव्हता; पण गुरुवारी दुपारी या गावात तासभर मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी वर्गात समाधान व्यक्त होत आहे. किट्टवडे या गावात पावसाचे आगमन झाल्यावर तालुक्यात पावसाची दमदार एन्ट्री होते हा नेहमीचा अनुभव असल्याने दोन दिवसांत पाऊस सर्वत्र सक्रिय होईल, अशी आशा आहे.

SCROLL FOR NEXT