कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा
कोल्हापुरात परदेशातून नागरिकांचे आगमन सुरूच आहे. सोमवारी 46 नागरिक परदेशातून आल्याने सोमवारअखेर परदेशातून आलेल्या नागरिकांची संख्या 576 झाली आहे. यामध्ये जोखीमग्रस्त देशांतून आलेल्या नागरिकांचाही समावेश आहे.
परदेशातून सोमवारी आलेल्या 46 पैकी 34 नागरिक शहरातील आहेत. उर्वरित प्रवाशांमध्ये भुदरगडमधील 1, गडहिंग्लज 4, हातकणंगले 6, कगल 1, शिरोळ 1 व करवीर तालुक्यातील 2 प्रवाशांचा समावेश आहे.
कोरोनाच्या तिसर्या लाटेची चर्चा सुरू असतानाच दक्षिण आफ्रिकेमध्ये ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण सापडला. त्यानंतर युनायटेड किंगडम, ब—ाझील, बोत्सवाना, चीन, न्यूझीलंड, झिंबाब्वे, सिंगापूर, हाँगकाँग, इस्रायल, नेदरलँड, इटली, पॅरिस आदी देशांतही ओमायक्रॉनचे रुग्ण सापडू लागले.
या जोखीमग्रस्त देशांतूनही नागरिक येऊ लागले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून जोखीमग्रस्त देशांतील विमानसेवेवर निर्बंध घालण्यात आले. विमान प्रवासासाठी लस घेतल्याचे प्रमाणपत्र, कालमर्यादेतील कोरोना चाचणी आदी गोष्टी बंधनकारक करण्यात आल्या आहेत. विमान प्रवाशांची नोंद ठेवण्यात येऊ लागली आहे.