पुढारी ऑनलाईन डेस्क
कतारमध्ये सुरू असलेल्या फुटबॉल विश्वचषकाच्या दुसऱ्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात मेस्सीच्या अर्जेंटिनाने ऑस्ट्रेलियाचा 2-1 असा पराभव केला. विजयासह या दिग्गज संघाने उपांत्यपूर्व फेरीतील आपले स्थान पक्के केले. तेथे अर्जेंटिनाचा मुकाबला नेदरलँडशी होईल. हा सामना 9 डिसेंबरला (शुक्रवार) होणार आहे.
अर्जेंटिनाचा कर्णधार लिओनेल मेस्सीने आपला 1000 वा सामना संस्मरणीय बनवला. त्याने अप्रतिम गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली. त्याने 34 व्या मिनिटाला गोल केला. पहिल्या हाफमध्ये ही आघाडी कायम राहिली. यानंतर दुसऱ्या हाफमध्ये पुन्हा एकदा अर्जेंटिनाने आक्रमक खेळ करत 57 व्या मिनिटाला दुसरा गोल डागला आणि आघाडी दुप्पट केली. संघासाठी दुसरा गोल ज्युलियन अल्वारेझने केला.
मात्र, यानंतर 77 व्या मिनिटाला ऑस्ट्रेलयाच्या खात्यात एका गोलची नोंद झाली. एन्झो फर्नांडिसकडून वोन गोल झाल्याने अर्जेंटिनाची आघाडी एक गोलने कमी झाली. त्यानंतर बरोबरी साधण्यासाठी ऑस्ट्रेलियन संघाने एकामागोमाग चढाया केल्या पण त्यांना अर्जेंटिनाचे गोलजाळे भेदता आले नाही. मेस्सीची बचावफळी प्रतिस्पर्धी संघाचे आक्रमण परतवून लावत होते. त्यामुळे पिवळ्या जर्सीच्या ऑस्ट्रेलियन संघाला यश मिळवता आले नाही. अशाप्रकारे अर्जेंटिनाने हा सामना 2-1 असा जिंकला.
मेस्सीने या सामन्यात पहिलाच गोल करून दिवंगत दिग्गज खेळाडू डिएगो मॅराडोनाला मागे टाकले. फिफा विश्वचषक स्पर्धेत अर्जेंटिनासाठी सर्वाधिक गोल करणारा मेस्सी हा दुसरा खेळाडू बनला आहे. 10 गोलसह गॅब्रिएल बटीस्टूटा नंबर 1 वर आहे. मेस्सीचे 9 आणि दिएगो मॅराडोनाचे 8 गोल आहेत. लिओनेल मेस्सीने त्याच्या कारकिर्दीत आतापर्यंत 789 गोल केले आहेत.
मेस्सीचा प्रथमच बाद फेरीत गोल…
मेस्सीने आतापर्यंतच्या कारकिर्दीत अर्जेंटिना, बार्सिलोना क्लब आणि पीएसजी क्लबसाठी एकूण एक हजार सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने 789 गोल केले आणि 338 असिस्ट केले आहेत. विश्वचषकाच्या इतिहासात मेस्सीने प्रथमच बाद फेरीत गोल केला आहे.
कुओल पेलेनंतरचा सर्वात तरुण खेळाडू
ऑस्ट्रेलियाच्या गारंग कुओलने इतिहास रचला आहे. 1958 नंतर विश्वचषकातील बाद फेरीत खेळणारा तो सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे. कुओलचे वय (सामना खेळेपर्यंत) 18 वर्षे 79 दिवस होते. याआधी 1958 मध्ये ब्राझीलचे महान फुटबॉलपटू पेले यांनी हा विक्रम केला होता. तेव्हा पेले यांचे वय 17 वर्षे 249 दिवस होते.