Latest

FOMO : इतरजण पार्टी करत असताना तुम्हाला सतावते ‘फोमो’ ची चिंता ? हे आहेत त्यावरचे उपाय

अमृता चौगुले

पुढारी ऑनलाईन डेस्क : कधी ना कधी तुमच्या आमच्या प्रत्येकाला स्पर्श करून जाणारी भिती म्हणजे फोमो… विस्तारीत रूपात सांगायचं म्हणजे 'फिअर ऑफ मिसिंग आउट'. आपण एखाद्या गर्दीचा भाग नाही आहोत. किंवा प्रवाहापासून, कळपापासून लांब चाललो आहोत ही भावना प्रत्येकालाच अस्वस्थ करते.  अगदी लांब कशाला सध्या न्यू इयर पार्टीचा मौसम जोरदार सुरू आहे. आपल्यापैकी बरेचजण अशा पार्टीपासून लांब राहणं पसंत करतात. पण या अशावेळी अनेकांच्या मनात फोमो म्हणजेच 'फिअर ऑफ मिसिंग आउट' येण्याची शक्यता असते. या असुरक्षिततेतूनच अनेकदा भावनिक होऊन टोकाचे निर्णय घेतले जाण्याची शक्याताही नाकारता येत नाही.

फोमो जाणवतो म्हणजे नक्की काय ?

आपलं आयुष्याची इतरांच्या सोशल मीडिया पोस्ट किंवा लाईफस्टाइलशी सतत तुलना करणे. यातूनच आपण प्रभावित करू शकत नाही किंवा अमुक एका व्यक्तीसारखं आपलं नेटवर्क नाही ही भावना मनात येत राहते. हे वाटण्याची फ्रिक्वेन्सी जर जास्त असेल तर तुम्हीही फोमोने ग्रस्त आहात. सोशल मीडियावरील काही फोटो पाहून तुम्हाला बाजूला पडल्यासारख वाटण हे फोमोचं मुख्य लक्षण आहे. अनेकदा सोशल मिडियावरील पोस्टना लाईक्स आले नाहीत, केलेल्या मेसेजला रीप्लाय आला नाही.

आजार नाही…

तुम्हालाही फोमो वाटत असेल तर त्यात अपराधी वाटण्यासारख काही नाही. अनेकदा अपराधी वाटून घेऊन अनेकजण अधिकाधिक निराशेच्या गर्तेत जातात. अशा वेळी स्वत:कडे अधिकाधिक मोकळेपणाने पाहण्याचा प्रयत्न करा.

फोमो सतावतो आहे ? हे आहेत उपाय

यादी करा : इतरांशी तुलना करण्याच्या नादात अनेकदा आपल्या आयुष्यातील चांगल्या आठवणी, आपली बलस्थान इतकंच कशाला काही चांगले मित्र-मैत्रिणी देखील विसरून बसतो. त्यामुळे जेव्हा फोमो जाणवेल त्यावेळी या सगळ्या सकारात्मक गोष्टींची यादी करा.

सगळं सत्य नसतं : सोशल मिडियावरील आभासी जगाच्या जाळ्यात आपण इतके हरवून जातो की त्यावरील सगळ्याच गोष्टी सत्य नसतात हे विसरून जातो. त्यामुळेच अनेकदा फोमो ही फिलिंग आपल्यावर हावी ठरते. प्रत्येकासमोरच अडथळे वेगळे असतात. त्यामुळे सोशल मिडियावर हायलाइट केलं जाणारं आयुष्य म्हणजे सत्य नाही हे ओळखायला शिका.

वेळ ठरवा : आयुष्य म्हणजे केवळ सोशल मीडिया नाही. प्रत्यक्ष जीवनात देखील अनेक बाबी आनंद देत असतात. तुम्हाला समृद्ध बनवत असतात. तुम्ही इंट्रोव्हर्ट असाल तर पुस्तकं, गार्डनिंग यासारख्या छंदामध्येही मन रमवू शकता. पण या सगळ्यांसाठी तुम्हाला सोशल मीडियाचा वापर मर्यादित किंवा विशिष्ट वेळेपुरताच करणं अतिशय गरजेचं आहे.

निसर्गाच्या सानिध्यात : निसर्गातील शांतता, थंडावा मनाला प्रफुल्लित करते, थकवा घालवण्यास मदत करते. त्यामुळे फोमो जाणवू लागला तर निसर्गाच्या सानिध्यात जास्तीत जास्त राहण्याचा प्रयत्न करा.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT