Latest

Pakistan PM | अन्वर उल हक कक्कर पाकिस्तानचे काळजीवाहू पंतप्रधान

अविनाश सुतार

पुढारी ऑनलाईन डेस्क: बलुचिस्तान अवामी पक्षाचे सिनेटर अन्वर उल हक कक्कर यांची पाकिस्तानचे काळजीवाहू पंतप्रधान म्हणून निवड करण्यात आली आहे, असे पंतप्रधान कार्यालयाकडून (पीएमओ) शनिवारी सांगण्यात आले. पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि नॅशनल असेंब्लीमधील विरोधी पक्षनेते (NA) राजा रियाझ यांनी आज झालेल्या बैठकीत काळजीवाहून पंतप्रधान म्हणून कक्कर यांच्या नावावर एकमती दर्शवली. त्यानंतर पीएमओकडून अन्वर उल हक कक्कर यांची नावाची घोषणा करण्यात आली. (Pakistan PM)

पीएमओने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, शाहबाज शरीफ आणि रियाझ यांनी कक्कर यांच्या काळजीवाहू पंतप्रधानपदी नियुक्तीबाबतची शिफारस राष्ट्रपती अल्वी यांच्याकडे केली आहे.

पाकिस्तानमध्ये नॅशनल असेंब्ली बरखास्त केल्यानंतर राजकीय उलथापालथींना वेग आला होता. दरम्यान, नॅशनल असेंब्लीतील विरोधी पक्षनेते राजा रियाझ यांनी सांगितले की, अन्वर-उल-हक कक्कर यांची पाकिस्तानचे अंतरिम पंतप्रधान म्हणून निवड करण्यात आली आहे.

पीएमओने म्हटले आहे की, पीएम शहबाज आणि नॅशनल असेंब्लीमधील विरोधी पक्षनेते (एनए) राजा रियाझ यांनी अध्यक्ष अल्वी यांना काळजीवाहू पंतप्रधान म्हणून अन्वर उल हक यांच्या नियुक्तीबाबत सल्ला मागितला होता. तत्पूर्वी रियाझने पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर याला दुजोरा दिला होता.

9 ऑगस्ट रोजी संसद विसर्जित झाल्यामुळे शहबाज शरीफ यांचा कार्यकाळही संपुष्टात आला होता. अशा स्थितीत कार्यवाहक पंतप्रधान निवडीसाठी शनिवारी (दि.१२) पर्यंत मुदत होती. यापूर्वी, कार्यवाहक पंतप्रधान ठरवण्यासाठी शहबाज शरीफ आणि राजा रियाझ यांच्यात अनेक बैठका झाल्या. दुसरीकडे, पाकिस्तानचे राष्ट्रपती आरिफ अल्वी यांनी लवकरात लवकर नवीन काळजीवाहू पंतप्रधान नियुक्त करण्याचे पत्र लिहिले होते, ज्यावर शाहबाज शरीफ यांनीही काहीशी नाराजी दर्शवली होती.

शुक्रवारी इस्लामाबादमध्ये माध्यमांशी संवाद साधताना शहबाज शरीफ यांनी शनिवारपर्यंत पंतप्रधानपदाचे नाव निश्चित केले जाईल, असे सांगितले होते. आघाडीतील पक्षांच्या नेत्यांशीही या नावावर चर्चा करून त्यांना विश्वासात घेतले जाईल, असे ते म्हणाले होते. राष्ट्रपतींच्या पत्राचा संदर्भ देत शहबाज शरीफ म्हणाले, 'राष्ट्रपतींना इतकी घाई का आहे? कदाचित त्यांनी संविधान वाचले नसावे.

Pakistan PM  :अन्वर उल हक कक्कर यांचा राजकीय प्रवास

२०१८ मधील पाकिस्तानी सिनेट निवडणुकीत बलुचिस्तानमधून सर्वसाधारण जागेवर अपक्ष उमेदवार म्हणून कक्कर पाकिस्तानच्या सिनेटमध्ये निवडून आले होते. १२ मार्च २०१८ रोजी सिनेटर म्हणून त्यांनी शपथ घेतली होती. त्यांनी बलुचिस्तान अवामी पार्टी (BAP) या नवीन राजकीय पक्षाची स्थापना केली होती.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT