Latest

2047 मधील ‘इफ्फी’ सर्वोत्कृष्ट असेल : अनुराग ठाकूर

Arun Patil

पणजी, पुढारी वृत्तसेवा : गोव्याने इफ्फीची परंपरा मागील 20 वर्षे चांगल्या पद्धतीने सांभाळली आहे. येत्या 2047 मध्ये गोव्यातील इफ्फी जगातील सर्वोत्कृष्ट असेल. त्यासाठी सर्वतोपरी सहकार्य केंद्र सरकारतर्फे केले जाईल, अशी ग्वाही केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर यांनी इफ्फीच्या उद्घाटन सोहळ्यावेळी दिली.

संपूर्ण जगाची उत्कंठा वाढवणार्‍या 54 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा उद्घाटन सोहळा चित्रपटसृष्टीतील तारे आणि तारकांच्या उपस्थितीत बांबोळी येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर दिमाखात झाला.

पारंपरिक भारतीय पद्धतीने दीपप्रज्वलन करून सोहळ्याला सुरुवात झाली. केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय राज्यमंत्री एल. मुरुगन, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, आमदार तथा गोवा मनोरंजन संस्थेच्या उपाध्यक्ष डिलायला लोबो, राज्याचे मुख्य सचिव पुनीतकुमार गोयल, नीरजा शेखर, धकधक गर्ल माधुरी दीक्षित, अभिनेता सनी देओल व शाहिद कपूर आदींच्या उपस्थितीत सोहळा पार पडला. गोव्यातील हा 20 वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी 3 पटीने देश-विदेशातील चित्रपट या महोत्सवात सामील झाले आहेत. महोत्सवात गोव्यातील 20 चित्रपटांच्या प्रवेशिका दाखल झाल्या होत्या. त्यातील 7 चित्रपट या महोत्सवात दाखवले जाणार आहेत. 'द कॅचिंग डस्ट' या चित्रपटाने महोत्सवाचा प्रारंभ झाला.

महोत्सवासाठी सुमारे 3,000 चित्रपटांच्या प्रवेशिका आल्या होत्या. त्यातील 280 चित्रपट निवडण्यात आले आहेत. गोव्यासह देश-विदेशातील प्रेक्षक, निर्माते, समीक्षक, दिग्दर्शक आदींना गोव्यातील 54 वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पर्वणी ठरणार आहे.

SCROLL FOR NEXT