Latest

Anurag Thakur: राहुल गांधी प्रत्येक विदेश दौऱ्यामध्ये भारताचा अपमान करतात – भाजपची टीका

मोनिका क्षीरसागर

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा: काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या विदेश दौऱ्यातील विधानांवरुन राजकीय आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली असून, गांधी हे प्रत्येक विदेश दौऱ्यात भारताचा अपमान करतात, अशी टीका भाजपकडून करण्यात आली आहे. गांधी यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अपमान करायचा असतो, पण शेवटी ते देशाचा अपमान केल्याशिवाय राहत नाहीत, अशी टीका भाजप नेते व केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur) यांनी केली आहे.

राहुल गांधी यांच्या प्रायोजित अमेरिका यात्रेचे नियोजन भारताचा अपमान करण्याच्या हेतुने असल्याचे सांगत ठाकूर (Anurag Thakur) ढे म्हणाले की, गांधी यांची आधीची भाषणे पाहिली तर ते भारताला देश मानतच नाहीत. ते भारताला 'राज्यांचा संघ' असे म्हणतात. देशाच्या विकासावरही ते प्रश्नचिन्ह उपसि्थत करतात. विदेशात जाऊन चिखल उडविणे, हे त्यांचे नित्याचे काम झाले आहे का, असा प्रश्न पडतो. एकीकडे देश प्रगतीची नवी शिखरे गाठत आहे व जगभरात भारताची प्रतिमा वाढत आहे. अशावेळी ही प्रतिमा कमी करण्याचा प्रयत्न राहुल गांधी करीत आहेत.

दुसरीकडे पंतप्रधान मोदी यांच्याकडे पहा. त्यांनी जवळपास 24 देशांच्या पंतप्रधानांच्या भेटी घेत 50 पेक्षा जास्त बैठका घेतल्या. अनेक देशांचे परराष्ट्र मंत्री मोदी यांना लोकप्रिय नेते म्हणतात. ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी तर मोदी यांना 'बॉस' म्हटले आहे, राहुल गांधी यांना मोदींची ही लोकप्रियता बघवत नाही, हे यावरून सिद्ध झाले आहे.

दरम्यान हरियानाचे गृहमंत्री अनिल विज यांनीही राहुल गांधी यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. जगभरातले नेते मोदी यांचे कौतुक करताना थकत नाहीत तर दुसरीकडे आपल्याच देशातला एक नेता विदेशात जाऊन मोदींना अपमान करीत आहे. अशा नेत्याचा देशवासियांनी बहिष्कार करण्याची वेळ आली आहे, असे विज यांनी सांगितले.

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT