होराभूषण रघुवीर खटावकर
राशी स्वामी शुक्र, पुरुष रास, वायुतत्त्व, चर स्वभाव, बोधचिन्ह तराजू.
राशीत चित्रा (२ चरण), स्वाती, विशाखा (३ चरण) असतात.
तुमची बौद्धिक राशी असून तुम्ही न्यायप्रिय आहात. स्त्रिया सुंदर, मोहक असतात.
वर्षभर नेपच्यून व राहु तुमच्या राशीच्या षष्ठस्थानी आहेत, तर प्लुटो चतुर्थस्थानी व शनि पंचमस्थानी राहील.
षष्ठस्थानातील राहुमुळे तुम्ही आग्रही रहाल व यश खेचून आणाल. राहु, नेपच्यूनमुळे चुकीचे औषध घेतले जाईल किंवा फूडपॉयझनिंग होऊ शकेल. अर्थात, असे होण्याचे योग तुमच्या स्वत:च्या कुंडलीत हवेत. आरोग्य इतरवेळी चांगले राहील.
चतुर्थ स्थानातील प्लुटोमुळे मोठी प्रॉपर्टी होऊ शकेल व गृहसौख्य बिघडू शकेल.
पंचमस्थानात कुंभ या वायुतत्त्वाच्या मूलत्रिकोण राशीत शनि राहील. बौद्धिक व शैक्षणिक क्षेत्रात लक्षणीय प्रगती कराल व यश मिळवाल. हा शनि चतुर्थेश असल्यामुळे संततीसाठी प्रॉपर्टी करून ठेवण्याचा प्रयत्न राहील.
मेपर्यंत गुरू, हर्षल एकत्र राशीच्या सप्तमस्थानी असतील. विवाह जुळेल. पुरस्कार मिळेल. सर्व काही अचानक घडून येईल. तुमच्या कामातील कर्तव्यतत्परता बघून स्त्री वर्ग प्रभावित होईल. संभाषणात वादाचे विषय टाळावेत.
मेनंतर गुरू व जूननंतर हर्षल राशीच्या अष्टमस्थानी येतील. प्रकृती सांभाळा. या काळात बुध कन्या राशीत (सप्टें.-ऑक्टो.) असताना व शुक्र वृषभेत (मे, जून) व कन्या राशीत (ऑगस्ट, सप्टें.) असताना विपरीत राजयोग झाल्यामुळे विपरीत घटनेतूनसुद्धा फायदाच होऊ शकेल.
बुध तुमच्या राशीला भाग्येश आहे. तो जूनमध्ये भाग्यातून भ्रमण करत असताना भाग्यकारक अनुभव येईल. पण आपले कर्तव्य करताना सद्सद्विवेक बुद्धी जागृत ठेवा. बुध तुळेत (ऑक्टो.) असताना नवनवीन कल्पना सुचतील; पण बोलण्याने इतरांना दुखवू नका.
शुक्र तर तुमचा राशीस्वामी असल्यामुळे तो तुम्हाला नेहमीच आनंदी ठेवतो व तुमच्यामुळे इतर लोकही आनंदी राहतात. शुक्र मीनेत (एप्रिल), मेषेत (एप्रिल-मे) असताना स्पर्धकांचा अंदाज घ्या. भावनिक दडपण येईल. शुक्र राशीला १० वा कर्केत (जुलै) धंद्यात नुकसान होऊ नये, याची काळजी घ्या.
मंगळाच्या प्लुटो शनिशी होणाऱ्या अशुभ योगात (जून-जुलै-ऑक्टोबर-नोव्हेंबर- डिसेंबर) गृहसौख्य बिघडेल. धंदा-व्यवसायात अडचणी निर्माण होऊ शकतील. जोखमीची कामे करताना अपघात होणार नाही, याची काळजी घ्या.
रवी मीनेत (मार्च-एप्रिल), कर्क-सिंहेत (जुलै-ऑगस्ट-सप्टेंबर) आणि तुळेत (ऑक्टोबर-नोव्हेंबर) राहील. सर्व कामात यश मिळत जाईल. या काळात प्रयत्नात तुम्ही कमी पडणार नाही, याची काळजी घ्या.
रवी मकरेत (जाने. फेब्र), वृषभेत (मे- जून) व कन्येत (सप्टें. – ऑक्टो.) असताना स्पर्धकांचा अंदाज घ्या. भावनिक दडपण येईल. घरगृहस्थीची काळजी राहील. शारीरिक दगदग होईल. धंद्यात मंदीचे वातावरण राहील. खर्चाचे प्रमाण वाढेल. रवीच्या कन्येतील भ्रमणात फौजदारी गुन्ह्यात अडकणार नाही, याची काळजी घ्या. सर्वसाधारण नियमाप्रमाणे कार्यसिद्धीसाठी चंद्रबल आवश्यक असते. या वर्षातील पूर्वार्ध तुमच्यासाठी भरभराटीचा राहील व गुरूकृपा राहील.
जानेवारी: १२,१६, १७,१९,२५, २७,२८, २९
फेब्रुवारी : १४, १६, २२, २४, २५, २६, २९
मार्च : ९,१४,२०,२१,२४, २७,२८, २९
एप्रिल : १६,१७,१८,१९,२२,२३
मे: १३,१५,१७,२१,२६, २७
जून : १२, १३, १४, १७,१८,१९,२२,२३
जुलै : ११, १५, १९, २०, २१
ऑगस्ट : ११,१२,१६,१७,२२,२३, २४
सप्टेंबर : ९,१२, १८, १९,२०,२१,२२
ऑक्टोबर : ९१०,१६, १७, १८, १९
नोव्हेंबर : १२,१४,१५,१८,२०
डिसेंबर : १०,१२,१३,१८,१९,२०