Latest

अनिल परब यांना दणका : साई रिसॉर्ट पाडण्यासाठी वर्तमानपत्रातून जाहिरात

अविनाश सुतार

पुढारी ऑनलाईन डेस्क : राज्याचे माजी परिवहन मंत्री आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते अनिल परब यांना राज्य सरकारने मोठा दणका दिला आहे. अनिल परब यांचे दापोलीतील साई रिसॉर्ट पाडण्यात येणार आहे. हे रिसॉर्ट पाडण्यासाठी राज्याच्या बांधकाम विभागाने स्थानिक वर्तमानपत्रातून जाहिरात दिली आहे. तसेच, तीन महिन्यांत हे रिसॉर्ट पाडण्यासाठी मुदत देण्यात आली आहे.

रायगड जिल्ह्यातील दापोली तालुक्यामध्ये मुरुड येथे उभारलेलेे त्यांचे बहुचर्चित साई रिसॉर्ट व सी कौंच रिसॉर्ट तोडण्याचे आदेश केंद्र सरकारच्या वन आणि पर्यावरण मंत्रालयाने दिले आहेत. विशेष म्हणजे सीआरझेड कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल सी कौंच रिसॉर्टला 37 लाख 91 हजार 250 रुपये व साई रिसॉर्टला 25 लाख 27 हजार 500 रुपये दंड ठोठावण्यात आला आहे.

पर्यावरणाशी संबंधित तज्ज्ञ अधिकार्‍यांच्या पथकाने मुरुड येथील या दोन रिसॉर्टची पाहणी केली होती. त्यानंतर त्याचा अहवाल पर्यावरण मंत्रालयाला सादर करण्यात आला. या अहवालाच्या आधारे केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने 22 ऑगस्टला महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट अ‍ॅथॉरटीचे सदस्य सचिव व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव यांना पत्र पाठवले आहे. त्यामुळे आता साई रिसॉर्टवर हातोडा चालवला जाणार हे पक्के झाले होते .

SCROLL FOR NEXT