Latest

Anant Chaturdashi : गणरायाला आज निरोप

मोहन कारंडे

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : चैतन्यदायी वातावरणात मागील दहा दिवसांपासून साजर्‍या होत असलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाची गुरुवारी, अनंत चतुर्दशीने सांगता होत आहे. बाप्पाला निरोप देण्यासाठी तालीम संस्था, तरुण मंडळांकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. चित्ररथ, प्रबोधनात्मक देखावे, पारंपरिक वाद्ये, साऊंड सिस्टीम, लाईट इफेक्टस्सह बाप्पांची विसर्जन मिरवणूक वैशिष्ट्यपूर्ण ठरणार आहे. सुमारे एक हजार पोलिसांसह प्रशासन बंदोबस्तासाठी सज्ज झाले आहे.

यंदाही विसर्जन मिरवणुकीतील वेगळेपण जपण्यासाठी सार्वजनिक मंडळांनी तयारी पूर्ण केली आहे. विसर्जनासाठी मुख्य मिरवणूक मार्ग महाद्वार रोडमार्गे इराणी खण असा असून, यासोबत समांतर मार्ग व पर्यायी मार्गही उपलब्ध आहेत.

मिरवणुकीच्या विरुद्ध दिशेने जाऊ नये

मिरवणुकीचा मुख्य मार्ग बिनखांबी गणेश मंदिर-पापाची तिकटी -गंगावेस असा आहे. मिरवणुकीच्या दिशेने जाणार्‍या गणेश भक्तांना दुतर्फा पुढे सरकता येईल. विरुद्ध दिशेने कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. मुख्य मार्गाला दोन्ही बाजूस बॅरिकेडिंग करून त्या ठिकाणी पोलिस बंदोबस्त नेमण्यात येणार आहे.

मुख्य मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी 6 एंट्री पॉईंट

उमा टॉकिज-टेंबे रोड देवल क्लब-मिरजकर तिकटी-बिनखांबी गणेश मंदिर-महाद्वार रोड या पारंपरिक विसर्जन मार्गावर सहभागी होण्यासाठी मंडळांना सहा एंट्री पॉईंट असणार आहेत. यामध्ये खरी कॉर्नरकडून 1) बिनखांबी गणेश मंदिर, 2) कोळेकर तिकटीकडून मिरजकर तिकटी, 3) ताराबाई रोडवरून महाद्वार चौक, 4) बिंदू चौकमार्गे पापाची तिकटी, 5) टेंबे रोडमार्ग मिरजकर तिकटी, 6) आईसाहेब महाराज पुतळा, पद्मा चौक ते बिंदू चौक.

आपत्कालीन रुग्णवाहिका सेवा

घाटी दरवाजा, पापाची तिकटी, गंगावेस, सावित्रीबाई फुले हॉस्पिटल चौक, इराणी खण, बिंदू चौक अशा सहा ठिकाणी गणेश भक्तांसाठी आपत्कालीन रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या आहेत.

गणेशमूर्ती विसर्जनानंतर परतीचे मार्ग

इराणी खण येथे विसर्जनानंतर मंडळांनी रावजी मंगल कार्यालय, नवीन वाशी नाका, कळंबा रिंगरोड, संभाजीनगरमार्गे पुढे जावे. राजारामपुरी, शाहूपुरीकडे जाणार्‍या वाहनांनी कळंबा रिंगरोडवरून रामानंदनगर, जरगनगर, आर. के. नगर, शेंडा पार्कमार्गे पुढे जावे. फुलेवाडीकडे जाणारी वाहने नवीन वाशी नाका, फुलेवाडी रिंगरोडमार्गे पुढे जातील.

वाहनांसाठी पर्यायी मार्ग

रत्नागिरीमार्गे शहरात येणारी वाहतूक सीपीआर चौकमार्गे पुढे जाईल. कोणत्याही वाहनधारकांनी शहरात प्रवेश करू नये. गारगोटी, राधानगरी, गगनबावड्याकडे जाणार्‍या वाहनांनी ताराराणी पुतळा, हायवे कँटिन चौक, सायबर चौक, रिंगरोड, कळंबा कारागृह, फुलेवाडी रिंगरोड या मार्गाचा अवलंब करावा. शिये फाटा, कसबा बावड्याकडून येणार्‍या वाहनांनी राष्ट्रीय महार्गावरून तावडे हॉटेल, शिरोली नाकामार्गे शहराबाहेरून पुढे जावे.

गणेश भक्तांसाठी 14 ठिकाणी पार्किंग

दुचाकी वाहने : दसरा चौक, तोरस्कर चौक शाळा, शिवाजी स्टेडियम, सिद्धार्थनगर कमान, दुधाळी मैदान, ताराराणी हायस्कूल (मंगळवार पेठ).
चारचाकी वाहने : खानविलकर पंपाशेजारील 100 फुटी रस्ता, शाहू दयानंद हायस्कूल (मंगळवार पेठ), पेटाळा मैदान (खरी कॉर्नर), निर्माण चौक, दसरा चौक, दुधाळी मैदान, गांधी मैदान, संभाजीनगर बसस्थानक परिसर.

मुख्य पारंपरिक मार्ग : उमा टॉकिज चौक, सावित्रीबाई फुले चौक, टेंबे रोड, मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर चौक, महाद्वार रोड, पापाची तिकटी, गंगावेस चौक, रंकाळा स्टँड, जावळाचा गणपती चौक, राज कपूर पुतळा, इराणी खण.

समांतर मार्ग : उमा टॉकिज चौक, आझाद चौक, कॉमर्स कॉलेज-दुर्गा हॉटेल, बिंदू चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौकमार्गे पापाची तिकटी, गंगावेस, इराणी खण.

पर्यायी मार्ग : उमा टॉकिज, सावित्रीबाई फुले हॉस्पिटल, यल्लम्मा मंदिर चौक, हॉकी स्टेडियम, इंदिरासागर हॉल, सुधाकर जोशीनगर चौक, देवकर पाणंद चौक, क्रशर चौक, इराणी खण, असे विसर्जन मिरवणुकीचे मार्ग आहेत.

एक हजार पोलिस, 700 होमगार्ड

अप्पर पोलिस अधीक्षक – 1, पोलिस उपअधीक्षक – 8, पोलिस निरीक्षक – 26, सहायक उपनिरीक्षक – 95, पोलिस अंमलदार – 974, होमगार्ड – 700, स्ट्रायकिंग फोर्स – 5, आरसीपी प्लाटून – 1, एसआरपीएफ तुकडी, असा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT