नवी दिल्ली : अंबानी परिवार आपल्या लक्झरियस राहणीमानामुळे नेहमीच चर्चेत असतो. या कुटुंबातील प्रत्येक सदस्याचे काही ना काही कलेक्शन कोटींच्या घरातील राहात आले आहे. याच पार्श्वभूमीवर, अलीकडेच जामनगरमधील एका शानदार प्री-वेडिंग सोहळ्यात अनंत अंबानी यांनी परिधान केलेले महागडे घड्याळ आताही सोशल मीडियावर बरेच चर्चेत राहिले आहे. हे महागडे घड्याळ थोडेथोडके नव्हे तर तब्बल 73 कोटी रुपयांचे असून जगभरात अशी केवळ 7 घड्याळेच बनवली गेली आहेत.
आता हे घड्याळ इतके महागडे असण्याचे कारण काय, हा प्रश्न साहजिकच मनात आल्याशिवाय राहणार नाही. या घड्याळाची अनेक वैशिष्ट्ये आहेत आणि यापैकी पहिले वैशिष्ट्य म्हणजे हे घड्याळ पूर्णपणे हाताने निर्मिले जाते. पटिक फेलिप या कंपनीचे हे घड्याळ असून या कंपनीचे सर्वात स्वस्त घड्याळ देखील 30 ते 40 लाखांच्या घरातील असते. ही कंपनी 1839 मध्ये स्थापन केली गेली असून महागडी मनगटी व भिंतीवरील घड्याळांसाठी त्यांनी स्वत:ची खास ओळख प्रस्थापित आहे. ब्लूमबर्गच्या एका अहवालानुसार, 2021 मधील या कंपनीची वार्षिक कमाई तब्बल 12 हजार 500 कोटी रुपये इतकी होती.
या घड्याळाचा प्रत्येक भाग हा हाताने निर्मिला जातो आणि हातानेच जोडला जातो. घड्याळ पूर्ण तयार झाल्यानंतर ते पटिक फेलिप कंपनीच्या मालकांना दाखवले जाते आणि त्यांनी संमती दिल्यानंतरच ते घड्याळ डिलिव्हरीसाठी उपलब्ध होते. केवळ हातानेच तयार केले जात असल्याने ते इतके महाग असल्याचे यावेळी सांगण्यात येते. रिलायन्स समूहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी हे जे घड्याळ परिधान करतात, त्याचीही किंमत 6.65 लाख रुपये इतकी आहे.