Latest

आठ वर्षांचा मुलगा दहावीच्या मुलांना शिकवतो गणित

Arun Patil

पाटणा : जगाला शुन्याची देणगी देणार्‍या व गणिताचे अनेक मूलभूत सिद्धांत शिकवणार्‍या भारतामध्ये गणित विषयातील प्रतिभावंतांची कधीच कमतरता नव्हती. श्रीनिवासा रामानुजन यांच्यापासून शकुंतला देवी यांच्यापर्यंत अनेकांच्या प्रतिभेने जगाला थक्क केलेले आहे. शकुंतला देवी यांचे गणितामधील कौशल्य तर अफलातूनच होते. 'मानवी कॉम्प्युटर' असेच त्यांना संबोधले जात होते.

लहान वयापासूनच त्यांनी आपल्या गणित विषयातील या प्रतिभेला जगासमोर आणले होते. त्यांच्या जीवनावर आधारित 'शकुंतला देवी' हा चित्रपटही बनला आहे व त्यामध्ये विद्या बालनने त्यांची भूमिका केली आहे. त्यांची आठवण येण्याचे कारण म्हणजे तसाच एक प्रतिभावान छोटा गणिततज्ज्ञ आता लक्ष वेधून घेत आहे. बिहारमधील हा अवघ्या आठ वर्षांचा आणि तिसरीत शिकणारा मुलगा दहावीच्या मुलांना गणिताचे धडे देतो!

या मुलाचे नाव आहे अभिनव, पण त्याला 'छोटे खान सर' असे म्हटले जाते. राजधानी पाटणापासून 23 किलोमीटरवर असलेल्या नदवाच्या चापौर येथे हा मुलगा राहतो. तो निमिषार्धातच अनेक प्रकारच्या गणितीय आकडेमोडीची उत्तरे देतो. आपले आई-वडील विद्यार्थ्यांना शिकवत असताना तो पाहत असे व त्यालाही यामुळे अध्यापनाची आवड निर्माण झाली. तो आठवी आणि दहावीच्या वर्गातील मुलांना गणित विषय शिकवतो. त्याला गणित विषयात सर्वाधिक रस असून मोठेपणी शास्त्रज्ञ होण्याची त्याची इच्छा आहे. त्याची उंची फळ्यापर्यंत पोहोचत नाही व त्यामुळे तो पायाखाली स्टूल घेऊन उभा राहतो. त्याला गणितामधील कोणताही प्रश्न विचारला की तो तत्काळ त्याचे उत्तर देतो. त्याच्यामध्ये वक्तृत्वकलाही चांगली आहे.

SCROLL FOR NEXT