Latest

Amway : श्रीमंत स्वप्नांचे सौदागर…

Arun Patil

अलीकडील काळात झटपट श्रीमंत बनवण्याचे स्वप्न दाखवणार्‍या सौदागरांचे पेव फुटले आहे. यासाठी विविध योजना बाजारात आणून, त्याकडे लोकांना आकर्षित केले जाते. परंतु त्यातील फोलपणा कालौघात समोर येतो आणि मग फसगतीशिवाय हाती काही राहात नाही. सध्या 'अ‍ॅमवे'वर (Amway) झालेल्या कारवाईमुळे हा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

पैसा हा काही ईश्वर नाही; पण तो ईश्वरापेक्षा कमी नाही, असे विधान एका बड्या राजकीय नेत्याने केले होते. गरिबांपासून ते श्रीमंतांपर्यंत सर्वांना एकच आस असते, ते म्हणजे आपल्याकडे अधिकाधिक पैसा असावा. मग हा पैसा कमावण्यासाठी कोणताही मार्ग पत्करण्याची काहींची तयारी असते. म्हणूनच की काय, अशा 'श्रीमंतोच्छुक' लोकांची फसवणूक करत पैसा कमावण्याचा धंदा आपल्याकडे जोरात चालतो. यासाठी अचानक श्रीमंत झालेल्या व्यक्तींची उदाहरणे देऊन, पंचतारांकित हॉटेलांमध्ये बैठका घेऊन, गुंतवणुकीच्या अनेक बनावट योजना आणल्या जातात.

कमीत कमी अवधीत जास्तीत जास्त परताव्याची आमिषे दाखवून गुंतवणूक गोळा केली जाते. कालांतराने अशी कंपनी गाशा गुंडाळते आणि गुंतवणूक करणार्‍यांच्या हाती पश्चात्तापाशिवाय दुसरे काही उरत नाही. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यासह राज्यात आणि देशात गेल्या काही वर्षांमध्ये अशा योजनांचे जबरदस्त पेव फुटले आहे. काही वर्षांपूर्वी 'इझी डील' नामक एका कंपनीने सांगली, कोल्हापूर, कराड, सातारा या भागात धुमाकूळ उडवून दिला होता. सहा हजार रुपये एकदाच भरा आणि वर्षभरात एक लाख रुपये मिळवा, असा दावा या कंपनीने केला होता. (Amway)

ग्रामीण भागातील हजारो कष्टकर्‍यांनी, नोकरदारांनी यामध्ये मोठ्या आशेने पैसे गुंतवले. या कंपनीने विविध भागांत आपली कार्यालये स्थापन केली होती. तेथील स्थानिक तरुणांना त्यामध्ये भरती करून घेतले होते, त्यामुळे लोकांचा विश्वास संपादन करणे अधिक सोपे गेले. पण कंपनीने गाशा गुंडाळला तेव्हा सर्वांचीच फसगत झाली. मनी सर्क्युलेशनच्या माध्यमातून आम्हाला इतका छप्परफाड परतावा देणे शक्य होते, असा या कंपनीचा दावा होता. तो पटवून सांगण्यासाठी कंपनीकडून प्रतिनिधी नेमण्यात आले होते आणि आलिशान हॉटेल्समध्ये चहा-नाष्ट्याची सोय उपलब्ध करून देत लोकांना ते आपली योजना गळी उतरवत असत.

वास्तविक पाहता, ही एक मोडस ऑपरेंडी आहे. काही कंपन्या थेट गुंतवणुकीच्या योजना आणून जनतेची फसवणूक करतात; तर काही कंपन्यांनी यापेक्षा थोडी वेगळी वाट अवलंबत विविध उत्पादने विक्रीचा फंडा शोधून काढला. यासाठी चेन मार्केटिंग किंवा मल्टिलेव्हल मार्केटिंग म्हणजेच साखळी विपणन पद्धतीचा आधार घेतला. यामध्ये उत्पादनांच्या विक्रीसाठी कोणतीही जाहिरातबाजी केली जात नाही, मध्यस्थ नाहीत, असे सांगत थेट कंपनी ते ग्राहक अशा मार्गाने उत्पादने विकली जातात. पारंपरिक विक्री व्यवस्थेप्रमाणे यामध्ये उत्पादने विकणार्‍यांना त्याबदल्यात कमिशन मिळतेच; पण आपण दुसरा विक्रेता जोडला आणि त्याने उत्पादनांची विक्री केली तरीही त्याबदल्यात आपल्याला काही प्रमाणात कमिशन मिळते. (Amway)

कालांतराने आपल्या हाताखाली अशा विक्रेत्यांची फळी उभी केल्यास, आपण काहीही न करता नियमित भरघोस उत्पन्न मिळत राहते, असे या कंपन्यांकडून सांगितले गेले. इतकेच नव्हे, तर यामुळे आपल्या म्हातारपणीची आर्थिक सुरक्षा कशी निर्माण होऊ शकते, असेही आकड्यांच्या खेळाद्वारे दाखवले गेले. तशा प्रकारची उदाहरणे समोर आणली गेली. मोठमोठ्या हॉटेल्समध्ये सेमिनार्स आयोजित करून तिथे हे तथाकथित यशस्वी आणि प्रचंड श्रीमंत झालेले चेहरे प्रत्यक्ष उपस्थित करून विश्वास संपादन केला गेला.

एसी वातावरणात, स्वादिष्ट पदार्थांचा आस्वाद घेत, साहेबी लूक घेऊन आलेल्या लोकांना 'मध्यमवर्गीय म्हणून जगणे सोडा, श्रीमंत होण्याची स्वप्ने पाहा. ती यशस्वी होण्यासाठी व्यक्तिमत्त्वात बदल घडवा.' अशा आशयाचे सध्या सोशल मीडियावर चलतीत असणारे दिलखेचक संवाद असणारी भाषणे ऐकवल्यानंतर परिस्थितीशी संघर्ष करताना कंटाळलेले लोक त्याला भुलले नसते तरच नवल! मग या लोकांकडून पैसे घेऊन त्यांच्या माथी बाजारभावापेक्षा प्रचंड अधिक किंमत असलेली उत्पादने मारण्यात आली.

या उत्पादनांच्या किमती ऐकून थक्क होण्याआधीच त्याच्या गुणवत्तेविषयीचे लांबलचक पुराण ऐकवलेले असते. त्यामुळे बाजारात उपलब्ध असणार्‍या दर्जेदार उत्पादनांपेक्षा प्रचंड महागडी असणारी ही उत्पादने खपतील की नाही, याचा विचार न करता जमलेले 'श्रीमंतोच्छुक' खिसा रिकामा करून ती खरेदी करू लागले. शॅम्पू, टूथपेस्ट, पावडर, तेल, साबण यांसारखी रोजच्या वापरातील आणि नाशवंत नसलेली उत्पादने असल्यामुळे लोकांना त्याकडे आकृष्ट करणे सोपे गेले. पण दोन-पाच हजार रुपये भरून या उत्पादनांचे पहिले कीट घरी घेऊन परतल्यानंतर सदर व्यक्तींना ती खपवण्यातील आव्हानांची जाणीव होऊ लागली.

विशेष म्हणजे या कंपन्यांना लोकमानसिकतेचा इतका प्रचंड अभ्यास होता की, त्यांनी या सर्वांची शक्यता गृहीत धरून त्याच्या व्यवस्थापनाचीही तजवीज करून ठेवली होती. त्यामुळे लोकांना विक्री कशी करायची, याबाबत सतत मार्गदर्शन करण्यात येत असे. प्रत्यक्षात तो विक्रीसाठीचा दबावच असायचा. वस्तुतः, बाजारात आकर्षक असल्यामुळे उत्पादने खपत नाहीत, तर कोणतीही वस्तू वा सेवा गुणवत्तापूर्ण आणि किफायतशीर दरात असावी लागते. या बाजार अर्थशास्त्राच्या वास्तवाचे भान विसरून केवळ छानछोकीला आणि स्वप्नांना भुलल्यामुळे हजारो जणांची फसगत झाली. कारण या उत्पादनांच्या विक्रीला मर्यादा येत गेल्या. (Amway)

ही सर्व चर्चा करण्याचे कारण म्हणजे या मल्टिलेव्हल मार्केटिंग संकल्पना भारतात जोमाने पसरवण्यात ज्या कंपनीचा सिंहाचा वाटा आहे, त्या 'अ‍ॅमवे' इंडिया कंपनीची 757.77 कोटींची मालमत्ता ईडीने नुकतीच जप्त केली आहे. हे वृत्त समोर आल्यानंतर या कंपनीशी जोडल्या गेलेल्या हजारो जणांना धक्का बसला असल्यास नवल नाही. 1998 मध्ये 'अ‍ॅमवे'ने भारतात प्रवेश केला आणि 2000 सालापर्यंत अत्यंत जोरकस पद्धतीने मार्केटिंग करून कंपनीने आपला पाया चांगल्या प्रकारे विस्तारण्यास सुरुवात केली. तुमचे रोजचे काम करून, दिवसातले फक्त एक-दोन तास काम करून तुम्ही काही वर्षांत टाटा-बिर्ला-अंबानींसारखे श्रीमंत बनू शकता, अशा प्रकारचे स्वप्न कंपनीने दाखवले.

विशेष म्हणजे, ज्यांनी आपल्या संपर्कातील अनेकांना जोडून घेत कंपनीची उत्पादने मोठ्या प्रमाणात विकली, त्यांना बक्कळ फायदाही झाला. साहजिकच त्यांची उदाहरणे आदर्श म्हणून उभी केली गेली. त्यामुळे अधिकाधिक लोकांना आकर्षित करणे सोपे झाले. पाहता पाहता विमा एजंटप्रमाणे गावागावात 'अ‍ॅमवे'ची उत्पादने विकणारे दिसू लागले. दरम्यानच्या काळात कंपनीने आपल्या उत्पादनांची संख्याही वाढवली. आरोग्याच्या क्षेत्रात प्रवेश करून प्रतिकारशक्ती वाढवणार्‍या औषधांची विक्री सुरू केली. कोव्हिडच्या काळात या उत्पादनांना जबरदस्त मागणी दिसून आली. विशेष म्हणजे कोणतेही वैद्यकीय प्रशिक्षण नसलेल्या उमेदवारांकडून घोकमपट्टी करून घेऊन या उत्पादनांची उपयुक्तता पटवून देत, त्यांची विक्री केली गेली.

या कंपनीने 2002-03 ते 2020-21 या काळात आपल्या व्यवसायाच्या माध्यमातून 27,562 कोटी रुपये जमवले आणि भारत व अमेरिकेतील आपल्या प्रतिनिधींना 7588 कोटी रुपये कमिशनही दिले. ईडीने दिलेल्या माहितीनुसार, कंपनी थेट विक्री एमएलएम नेटवर्कच्या पडद्याआडून घोटाळा करत आहे. कंपनीचा सदस्य बनून श्रीमंत कसे होता येईल, याचा प्रचार करण्यावर त्यांचे संपूर्ण लक्ष केंद्रित आहे. उत्पादनावर लक्ष नाही, असा आरोप ईडीने केला आहे. कंपनीने दिलेल्या बहुतेक उत्पादनांच्या किमती या खुल्या बाजारात उपलब्ध असलेल्या प्रतिष्ठित उत्पादकांच्या तुलनेत जास्त आहेत, याकडे ईडीने लक्ष वेधले आहे. 'अ‍ॅमवे' विरोधात मागील काळातही तक्रारी दाखल केल्या गेल्या आहेत. (Amway)

2006 ते 2014 या काळात आंध्र प्रदेश पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात या कंपनीकडून एमएलएमच्या नावाखाली मनी लाँड्रिंग योजना चालवली जात असल्याचे म्हटले होते. अशाच प्रकारचे आरोप कॅनडा आणि अमेरिकेतही या कंपनीवर झाले आहेत. 'अ‍ॅमवे'वर कारवाई होण्याचे कारण म्हणजे या कंपनीकडून उत्पादनांच्या खरेदीसाठी पैसे न घेतले जाता, ते सदस्य नोंदणीसाठी घेतले जातात आणि नंतर त्यांना त्याबदल्यात उत्पादने घेण्यास सांगितले जाते. पुढे जाऊन ती उत्पादने इतरांना विकण्यासाठी सांगतात. म्हणजेच इथेही मनी सर्क्युलेशनचा फंडा अवलंबला जातो, असे सांगितले जाते. लोकांकडून घेतलेले पैसे लोकांकडेच फिरवले जात असल्याने हा एक प्रकारचा घोटाळा आहे, असा आरोप आहे. कंपनीने या आरोपांचे खंडन करण्याऐवजी तपासास सहकार्य करत असल्याचे म्हटले आहे. याबाबतची कायदेशीर लढाई येत्या काळात सुरू राहील.

तथापि, मुख्य मुद्दा आहे तो भुलभुलैय्याला आणि आमिषांना बळी पडण्याचा. कारण 'अ‍ॅमवे' ही एकमेव कंपनी नाही. अनेक कंपन्यांनी लोकांमधील श्रीमंतीच्या वेडाचा गैरफायदा उचलण्याचा प्रयत्न केला आहे. मध्यंतरी, बार्शीतील विशाल फटे याने शेअर मार्केटमधून आकर्षक परतावा देण्याचे आमिष दाखवून गुंतवणकदारांकडून पैसे जमा केले. ट्रेडिंगमध्ये पैसे गुंतवून प्रचंड नफा मिळवून देण्याच्या या आमिषाला बळी पडून अनेकांनी त्याच्या तीन कंपन्यांच्या खात्यात गुंतवणूक केली होती. पण अखेरीस हा घोटाळा उघडकीस आल्यानंतर, पैसे गुंतवणार्‍यांच्या तोंडचे पाणी पळाले. खरे पाहता, रिझर्व्ह बँकेकडून अशा योजनांबाबत सातत्याने प्रबोधन केले जात असते. (Amway)

या संदर्भातील कायदेही कडक करण्यात आले आहेत. पण तरीही अशा योजना येत राहतात तेव्हा पोलिस प्रशासनाचे त्याकडे दुर्लक्ष होत राहते. राजरोसपणाने हे योजनाकार श्रीमंतीची आमिषे दाखवत जाहिरातबाजी करतात, तेव्हाच त्यांच्याविषयीची नेमकी माहिती पडताळली गेली आणि ती कायद्याच्या कक्षेत बसणारी आहे की नाही, हे पाहिले गेल्यास लाखो लोकांची होणारी फसवणूक थांबली जाऊ शकते. दुसरीकडे, लोकांनीही सातत्याने समोर येणार्‍या अशा घटनांमधून बोध घेऊन शहाणे व्हायला हवे.अशा योजनांमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी त्यांच्या विषयीची खातरजमा करून घ्यायला हवी. अन्यथा 'तेलही गेले, तूपही गेले आणि हाती धुपाटणे आले,' अशी वेळ आल्याशिवाय राहात नाही.

सूर्यकांत पाठक,
कार्याध्यक्ष,
अ. भा. ग्राहक पंचायत

SCROLL FOR NEXT