Latest

धुळे विधान परिषद निवडणूक : भाजपकडून अमरिश पटेल हेच उमेदवार

दीपक दि. भांदिगरे

धुळे विधान परिषद निवडणूक : विधान परिषदेच्या सहा जागांसाठी १० डिसेंबरला निवडणूक होणार आहे. यात मुंबईतील दोन, कोल्हापूर, धुळे-नंदुरबार, अकोला-बुलडाणा-वाशिम आणि नागपूर या जागांचा समावेश आहे. दरम्यान, कोल्हापूर विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपने अमल महाडीक यांना तर धुळे विधान परिषद निवडणुकीसाठी अमरिश पटेल यांना उमेदवारी दिली आहे.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईतील निवासस्थानी सोमवारी सायंकाळी केंद्रीय मंत्री पियूश गोयल यांच्या उपस्थितीत भाजप महाराष्ट्र कोअर कमिटीची बैठक झाली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यावेळी उपस्थित होते. यात कोल्हापूर विधान परिषद निवडणुकीसाठी अमल महाडीक यांचे तर धुळे विधान परिषद निवडणूकीसाठी अमरिश पटेल यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. दिल्ली पार्लमेंटरी बोर्डाकडून दोन-तीन दिवसांत त्यांच्या नावाची घोषणा होणार आहे.

धुळे विधान परिषद निवडणूक : याआधी धुळे-नंदुरबार विधान परिषद पोटनिवडणुकीत भाजपचे अमरिश पटेल यांनी बाजी मारली होती. अमरिश पटेल यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पराभव केला होता.

दरम्यान, विधान परिषदेच्या कोल्हापूर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत अखेर पालकमंत्री सतेज पाटील यांच्याविरुद्ध भाजपने माजी आमदार अमल महाडीक यांना उमेदवारी दिली आहे.  यामुळे सतेज पाटील व महाडीक या पारंपारीक विरोधकातच आता विधान परिषदेची काटाजोड लढत होणार आहे. कारण सतेज पाटील यांच्याविरूद्ध भाजप तगडा उमेदवार कोण देणार? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते.

प्रज्ञा सातव यांना काँग्रेसकडून विधान परिषदेची उमेदवारी

दरम्यान, काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांना विधान परिषदेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. प्रज्ञा सातव यांच्या उमेदवारीला मंजुरी दिल्याचे पत्र काँग्रेसने नुकतेच ट्विट केलं. राजीव सातव यांच्या निधनानंतर राज्यसभेवर प्रज्ञा सातव यांची वर्णी  लागणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती; पण राज्यसभेवर रजनी पाटील यांची वर्णी लागली. यावेळी प्रज्ञा सातव यांना विधान परिषदेवर घेण्याचे आश्वासन काँग्रेसने दिले होते.

SCROLL FOR NEXT