Latest

काँग्रेसला जमले नाही ते मोदींनी नऊ वर्षांत केले! : गृहमंत्री अमित शहा

Arun Patil

नांदेड, पुढारी वृत्तसेवा : स्वातंत्र्यप्राप्तीनंतर काँग्रेसच्या चार पिढ्यांनी देशात जे काम केले नाही, ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या नऊ वर्षांच्या कारकिर्दीत करून दाखविले आहे. त्यांनी परदेशातही भारताचा सन्मान वाढवल्याचा दावा करताना, 2024 मध्ये पुन्हा पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी यांना विराजमान करण्यासाठी महाराष्ट्रातून 45 खासदार निवडून द्या, असे आवाहन करीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले. आपल्या भाषणात त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचाही वेगवेगळ्या मुद्द्यांवर समाचार घेतला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीस नऊ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल भाजपने देशपातळीवर सुरू केलेल्या महाजनसंपर्क अभियानात अमित शहा यांची महाराष्ट्रातील पहिली ऐतिहासिक सभा नांदेड येथे झाली. या विशाल सभेच्या व्यासपीठावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावन्नकुळे, उत्तराखंडचेे माजी मुख्यमंत्री तिरथसिंग रावत, केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड, राज्यातील महाजनसंपर्क अभियानाचे प्रमुख आमदार प्रवीण दरेकर आदी उपस्थित होते. दरेकर यांच्याच नियोजनात ही सभा आयोजित करण्यात आली होती.

मोदी सरकारची नऊ वर्षे म्हणजे भारताच्या गौरवाची, गरिबांच्या कल्याणाची तसेच देशाच्या सुरक्षिततेची 9 वर्षे आहेत. सरकारच्या लोककल्याणकारी योजनांचा लाभ देशातील कोट्यवधी गरिबांना झाला असल्याचे सांगून गृहमंत्री अमित शहा यांनी पूर्वीचे यूपीए सरकार भ्रष्टाचाराने बरबटलेले होते, याकडे महाराष्ट्रवासीयांचे लक्ष वेधले. शहा पुढे म्हणाले की, देशातील विविध घटकांचे हित जपताना नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानच्या घरात घुसून दहशतवाद्यांना संपविले. 370वे कलम हटविण्याचे धाडस काँग्रेसला आपल्या राजवटीत दाखवता आले नाही, पण ते मोदी यांनी करून दाखविले.

* अमित शहा यांच्या आधी बोलताना उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, 2014 साली मोदींच्या नेतृत्वाखाली आम्ही विजय मिळवला. 2019 ला त्याची पुनरावृत्ती झाली. आता 2024 च्या महाविजयाची तयारी म्हणून ही सभा होत आहे. आपल्या जोशपूर्ण भाषणात त्यांनी मोदी सरकारने 9 वर्षांमध्ये विविध क्षेत्रांत केलेल्या कामांची माहिती दिली. काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी जालना-नांदेड द्रुतगती मार्गाची केवळ घोषणा केली होती, पण आमच्या सरकारने या मार्गाच्या भूसंपादनासाठी निधी उपलब्ध करून दिला असून या रस्त्याचे काम याच वर्षी सुरू होईल.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT