Latest

‘शिल्पांच्या देशा’ची परदेशी पर्यटकांना भुरळ!

Arun Patil

बेळगाव, अंजर अथणीकर : भारताचा गौरवशाली इतिहास पाहायचा असेल, वास्तुकलेची आवड असेल, तर कर्नाटकातील हंपी, बदामी आणि विजापूरला भेट द्यावी लागेल. बदामी हे प्रसिद्ध लेण्यांचे शहर आहे, तर हंपी ऐतिहासिक वारसा जतन केलेले महत्त्वाचे शहर आहे. म्हणूनच युनोस्कोने हंपीचा जागतिक वारसास्थळांच्या यादीत समावेश केला आहे. बदामी-हंपीला जवळपास लाखभर परदेशी पर्यटक वर्षाला भेट देतात. त्याचबरोबर विजापूरचा गोलघुमट ही जगप्रसिद्ध वास्तू आहे.

बदामी, हंपीच्या संपूर्ण परिसराला दगडांचा देश म्हटले, तर वावगे ठरणार नाही. यामुळेच याची परदेशी पर्यटकांना भुरळ आहे. ऐतिहासिक व सांस्कृतिक पार्श्वभूमी असणारे विजापूर शहर स्वस्तातले पर्यटन म्हणून पर्यटकांना साद घालत आहे.

बदामीच्या प्रसिद्ध लेण्यांची गणना भारताच्या सर्वात जुन्या लेण्यांत केली जाते. या लेण्यांमध्ये हिंदू, जैन आणि बौद्ध धर्माचे मिश्रण आढळते. ही लेणी कर्नाटक राज्यातील बागलकोट जिल्ह्यातील बदामी शहरात आहेत. बदामी येथे तयार झालेल्या चार गुहा सहाव्या शतकातील आहेत. इथल्या सर्व गुहा नागारा आणि द्राविडी शैलीमध्ये बांधण्यात आलेल्या आहेत.

हंपी : युनेस्कोने हंपीला जागतिक वारसास्थळ (हेरिटेज) घोषित केले आहे.
ऐतिहासिक विजापूर : जगातील दुसर्‍या क्रमांकाचा घुमट म्हणून गोलघुमटाकडे पाहिले जाते. गोलघुमटाला रोज चार ते पाच हजार पर्यटक भेट देतात. यासाठी 50 रुपये तिकीट असून, परदेशी पर्यटकांना शंभर रुपये तिकीट आहे.
पट्टदकल्ल : संगमेश्वर मंदिर ही इथली लोकप्रिय वास्तू.
ऐहोळे : इथल्या दुर्गादेवी मंदिराच्या छतावरची कलाकुसर विज्ञानालाही आव्हान देणारी आहे.

बदामी मुंबईपासून 622 कि. मी.

विजापूर शहर हे महाराष्ट्र सीमेशी संलग्न असून, विजापूर आणि सोलापूर जिल्ह्याची सीमा एक आहे. विजापूर मुंबईपासून सुमारे 550 किमी अंतरावर आहे. सोलापूरहून विजापूरचे अंतर शंभर कि. मी., तर बेळगावपासून 215 कि. मी. अंतर आहे. हैदराबादच्या पश्चिमेस 384 किमी अंतरावर आहे. बदामी मुंबईपासून 622 कि. मी., तर बेळगावहून 147 कि.मी. अंतरावर आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT