Latest

मराठा आरक्षणाबाबत आज सर्वपक्षीय बैठक; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पुढाकार

Arun Patil

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : मराठा आरक्षणासाठी उपोषणास बसलेले मनोज जरांगे-पाटील यांच्या अंतरवाली सराटी येथील आंदोलनापाठोपाठ राज्यभर आंदोलने सुरू झाली आहेत. यावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी मुंबईत सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे.

सह्याद्री अतिथीगृहात ही बैठक होईल. शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या सत्ताधारी पक्षांसोबतच राज्यातील सर्व प्रमुख पक्षांना बैठकीसाठी बोलवण्यात आले आहे. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, काँग्रेस, मनसेसह ठाकरे गटाचाही समावेश आहे. मात्र, आपल्याला या बैठकीचे अद्याप निमंत्रण मिळाले नाही, अशी माहिती विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे; तर निमंत्रण मिळाले असले तरी ठाकरे गट बैठकीला उपस्थित राहील का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मराठा आंदोलनाला पंधरवडा होत आहे. मात्र, सरकारकडून ठोस कृती होत नसल्याचे सांगत जरांगे यांनी उपोषण सुरूच ठेवले आहे. सरकारने जीआर काढून मराठा आरक्षणाची मागणी मान्य केली होती. मात्र, यातील वंशावळ हा शब्द काढून टाकून सर्व मराठ्यांना कुणबी दाखले देऊन आरक्षण मान्य करावे, अशी भूमिका जरांगेंनी घेतली आहे. त्यामुळे सत्तेतील तिन्ही पक्षांचे मंत्री आणि आमदार त्यांचे मन वळविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. पण अद्याप यश आले नाही. त्यामुळे अशा परिस्थितीमधून मार्ग काढण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी बैठक बोलावली आहे.

SCROLL FOR NEXT