Latest

चांदोलीचे चारही दरवाजे उघडले

Arun Patil

शित्तूर वारूण, पुढारी वृत्तसेवा : चांदोली धरणाचे चारही दरवाजे गुरुवार (दि.27) रोजी सकाळी दहाच्या दरम्यान उघडण्यात आले आहेत. धरणाच्या दरवाजातून 5150 क्यूसेक तर वीजनिर्मिती केंद्रातून 1630 क्यूसेक असा एकूण 6780 क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सध्या वारणा नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे.

गेल्या आठ ते दहा दिवसांपासून पावसाने धरण क्षेत्रात कहर केला आहे. गेल्या चोवीस तासांत 55 तर आजअखेर धरण क्षेत्रात 1085 मिलिमीटर पावसाची नोंद येथील पर्जन्यमापन यंत्रावर झाली आहे. धरणात सध्या 14443 क्यूसेक पाण्याची आवक सुरू आहे. पाणीपातळी 32 तासांत 1.6 मीटरने वाढली आहे. 34.40 टीएमसी पाणी साठवण क्षमता असलेल्या चांदोली धरणाची पाणी पातळी सध्या 621.65 मीटरवर पोहोचली आहे.

धरणात सध्या 827.108 द.ल.घ.मी म्हणजेच 29.21 टी.एम.सी पाणीसाठा झाला असून, धरण 84.90 टक्के भरले आहे. धरणाचे चारही दरवाजे 1 मीटरने खुले करण्यात आले असून त्यातून सुरू असलेल्या विसर्गामुळे वारणा नदीचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. हे पाणी पोटमळीत शिरले असून नदीकाठची शेती पाण्याखाली गेली आहे.

SCROLL FOR NEXT