Latest

राज्यातील सर्व परीक्षा आता ऑफलाईनच होणार

अमृता चौगुले

मुंबई : पुढारी वृत्तसेवा :  कोरोनाचे संकट निवळल्यामुळे राज्यातील सर्व विद्यापीठांच्या परीक्षा यापुढे ऑफलाईनच होतील, अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी दिली.

कोरोना कालावधीत ऑनलाईन परीक्षा सुरु केल्या होत्या. त्यावेळी काही परीक्षा ऑफलाईनही झाल्या होत्या. या परीक्षेदरम्यान विद्यार्थांच्या मागण्या पूर्ण करण्याचा शासनाने प्रयत्न केला आहे. ऑनलाईन परीक्षेनंतर अचानक ऑफलाईन परीक्षा होणार असल्याने विद्यार्थी गोंधळून गेले आहेत. यासाठी परीक्षेची वेळ वाढवून दिली. त्यांना परीक्षेआधी प्रश्नावली देण्याचा प्रयत्न केला आहे. पण आता परीक्षा मात्र ऑफलाईनच होतील, असे त्यांनी स्पष्ट केले.

बारावीच्या परीक्षेनंतर विद्यार्थ्यांना सीईटी द्यायची असते. त्यामुळे अधिक गुण मिळविण्यासाठी ते बारावीच्या अभ्यासक्रमाकडे दुर्लक्ष करतात. या गोष्टीचा विचार करून पुढच्या वर्षीपासून मेरीटसाठी 12वी आणि सीईटीचे प्रत्येकी 50 टक्के गुण ग्राह्य धरले जाणार आहेत. यापूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी असा निर्णय घेतला होता. अनेक विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी परदेशात जायचे असते. परदेशात परीक्षा आणि निकाल आपल्या अगोदर लागत असल्यामुळे शेवटच्या वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा आणि निकाल लवकर देण्याची सूचना विद्यापीठांना करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

देशातील अनेक महाविद्यालयांनी अभ्यासक्रम मराठीत सुरू केला आहे. इंजिनिअरिंगचा मराठी भाषेतला अभ्यासक्रम विद्यार्थ्यांनी चांगल्याप्रकारे स्वीकारला आहे. पुढच्या वर्षी शैक्षणिक वर्ष 1 सप्टेंबरला सुरू करण्याचा प्रयत्न करत आहोत, असेही सामंत यांनी सांगितले.

SCROLL FOR NEXT