Latest

Akshay Tritiya 2024 | अक्षय तृतीया शुक्रवारी, जाणून घ्या शुभमुहूर्त आणि पूजाविधी

दीपक दि. भांदिगरे

अक्षय तृतीया (Akshay Tritiya 2024) सनातन धर्मातील अतिशय महत्त्वाचा उत्सव आहे. अक्षय तृतीयेला अखातिज असेही नाव आहे. हिंदू कॅलेंडरनुसार वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतिया तिथीला अक्षय तृतीया म्हटले जाते. अक्षय तृतीयेला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केल्याने जीवनात प्रगती होते. तसेच या दिवशी सोने आणि चांदी खरेदी करणे शुभ मानले जाते.

जर आपण पौराणिक ग्रंथांचा विचार केला तर या दिवशी केलेली शुभ आणि धार्मिक विधी यांचे फळ दीर्घकाळापर्यंत राहातात. या दिवशी सूर्य आणि चंद्र उच्च राशीत आहेत. त्यामुळे दोन्हींची शुभफळ मिळणार आहेत. या दिवशी केलेली कामे नष्ट होत नाहीत, असे मानले जाते. या दिवशी बद्रीनाथ मंदिराचे दरवाजे खुले होतात तसेच वृंदावन येथील भगवान बांके बिहारी यांच्या चरणांचे दर्शन घेतले जाते.

अक्षय तृतीया २०२४ शुभमुहूर्त

यंदा अक्षय तृतीया शुक्रवारी १० मे रोजी आहे. हिंदू दिनदर्शिकेनुसार वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतिया तिथी १० मे रोजी सकाळी ४.१७ वाजता सुरू होत आहे. ही तिथी ११ मे रोजी सकाळी २ वाजून ५० मिनिटांनी संपेल. त्यामुळे उदय तिथीनुसार अक्षय तृतीया १० मे रोजी साजरी होईल. अक्षय तृतीयेला माता महालक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची पूजा करण्यासाठीचा शुभमुहूर्त सकाळी ५.४८ मिनिटांपासून ते दुपारी १२.२३ मिनिटांपर्यंत आहे.

अक्षय तृतीयेचा पूजाविधी

जे व्यक्ती या दिवशी उपवास करणार आहेत, त्यांनी सकाळी लवकर उठून अंघोळ करावी आणि पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करावेत. त्यानंतर भगवान विष्णूच्या मूर्तीला गंगेच्या पाण्याने स्नान घालावा, त्यानंतर तुळशीचे पाने, पिवळी फुले किंवा फक्त पिवळी फुले या मूर्तीला अर्पण करावीत. त्यानंतर अगरबत्तीने तुपाच्या वातीतील दिवा लावावा, त्यानंतर स्थानापन्न व्हावे. त्यानंतर विष्णू सहस्त्रनाम, विष्णू चालिसा यांचे पठण करावे. त्यानंतर भगवान विष्णूची आरती करावी. त्यानंतर पूजाविधी करणारी व्यक्ती गरजूंना अन्नदान करू शकते, हे शुभ मानले जाते.

अक्षय तृतीयेचे महत्त्व

ज्योतिषशास्त्रानुसार अक्षय तृतीयेला फार महत्त्व असते. या दिवशी सूर्य हा मेष राशीत तर चंद्र वृषभ राशीत आहे. असे मानले जाते की या दिवशी सूर्य आणि चंद्र जास्तीजास्त प्रकाश पृथ्वीला देतात. त्यामुळे अक्षय तृतीया सर्वाधिक शुभमुहूर्त मानला जातो.

अक्षय तृतीया उपाय

अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्हाला आत्मिक समाधान देणाऱ्या गोष्टी कराव्यात. पूजाविधी करावेत आणि ध्यानधारणा करावी. तसेच तुमची वर्तणूक गोड ठेवा. शक्य असेल तर इतरांना मदत करा. तुमच्या दारात आलेल्या गरजूंना रिकाम्या हाती परत पाठवू नका. या दिवशी सोने किंवा इतर मौल्यवान वस्तू खरेदी करणे शुभ मानले जाते.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT