अकोला ; पुढारी वृत्तसेवा कारवाईसाठी गेलेल्या गौण खनिज अधिकाऱ्यासह पथकावर गौण खनिज चोरट्यांकडून दगडफेक करण्यात आली. ही घटना आज (शनिवार) अकोला तालुक्यातील निंभोरा शिवारात घडली. यावेळी जीव वाचवण्यासाठी खनिकर्म अधिकारी प्रणिता राजेंद्र चापके यांच्या अंगरक्षकाने हवेत गोळीबार केला. यामुळे पुढील अनर्थ टळला.
अकोला जिल्ह्यात सध्या गौण खनिज चोरीच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी जिल्हा खनिकर्म अधिकारी प्रणिता राजेंद्र चापके यांच्या नेतृत्वात धडकसत्र सुरु केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून या मोहिमेअंतर्गत अकोला तालुक्यातील निंभोरा शिवारात शनिवारी सकाळी आठ वाजता जिल्हा खनिकर्म अधिकारी चापके या धाड टाकण्यासाठी गेल्या असता, गौण खनिज चोरट्यांनी त्यांच्यावर दगडफेक करण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान जिल्हा खनिकर्म अधिकारी यांच्या आदेशानुसार त्यांच्या अंगरक्षकांनी हवेत गोळीबार केल्याने प्रसंग टळळा. ही घटना अकोला तालुक्यातील अकोट अकोला रोड वरील पूर्णा नदी पात्रात घडली. संपूर्ण राज्यात महसूल विभागातर्फे रेती घाटावर कारवाई सत्र सुरु आहे. अकोला जिल्ह्यातही जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी यांच्या मार्गदर्शनात कारवाईचे सत्र सुरू आहे. जिल्हा खनिकर्म अधिकारी प्रणिता राजेंद्र चापले यांनी अकोला जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांना पत्र पाठवून गौण खनिज चोरट्यांचा बंदोबस्त करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील विविध ठिकाणी भेट देऊन गौण खनिज करणाऱ्या चोरट्याविरुद्ध कारवाई करीत आहेत.
दरम्यान त्या ठिकाणी वीस ते पंचवीस जणांचा घोळका त्यांच्या अंगावर आला. त्यांना समजावून सांगितल्यावरही ते ऐकण्याच्या तयारीत नव्हते. उलट त्यांनी पथकावर दगडफेक केली. त्यामुळे खनिकर्म अधिकारी यांच्या सुचनेनुसार अंगरक्षकाने हवेत गोळीबार केला. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली.
पुर्णा नदी पात्र बनले टार्गेट
गौण खनिज चोरट्यांनी पुर्णा नदी पात्र टार्गेट बनवले आहे. विशेष म्हणजे जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी सर्व तहसीलदारांना सुचना करून कारवाईच्या सुचना दिल्या आहेत. मात्र हितसंबध असल्याने अधिकारी कारवाई करण्यास धजावत नसल्याचे दिसते.