Latest

Ramdas Athawale welcomed Ajit Pawar : अजितदादा पवार यांच्या धाडसी निर्णयाचे स्वागत; केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

backup backup

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजितदादा पवार यांनी केलेले बंड हे अत्यंत धाडसी आहे. त्यांच्या या धाडसी निर्णयाचे आपण स्वागत करतो. पुन्हा एकदा नव्याने  महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री झाल्याबद्दल अजितदादा पवार यांचे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात आज नव्याने मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या मंत्र्यांचे आपण अभिनंदन करीत असल्याची प्रतिक्रिया आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी दिली.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात राज्याचा आणि देशाचा विकास होत राहील. प्रधानमंत्री मोदी चांगले काम करीत आहे. त्यामुळे त्यांना उगाच सतत विरोध करणे योग्य नाही, म्हणून अजितदादा पवार अनेकदा प्रधानमंत्री मोदींबद्दल चांगले बोलत होते. त्यामुळे यावेळी अजितदादा पवार यांनी सुयोग्य नियोजन करून केलेले बंड यशस्वी झाले. अजितदादा पवार यांचा निर्णय आहे धाडसी आणि देवेंद्र फडणवीस आहेत राजकीय मुत्सद्दी! असे ना.रामदास आठवले म्हणाले.

ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादीत ओबीसी समाजाला महत्वाचे स्थान दिले जात नसल्याची नाराजी व्यक्त केली होती. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे ओबीसी समाजातून आले आहेत.त्यांचा आदर्श घेऊन छगन भुजबळ यांनी घेतलेल्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो असे ना.रामदास आठवले म्हणाले.

खरेतर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीच एन डी ए सोबत यायला पाहिजे होते.अनेकदा शरद पवारांना आपण ही तसे आवाहन केले होते. मात्र त्यांनी एन डी ए मध्ये येण्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे आज त्यांची अवस्था उद्धव  ठाकरेंसारखी झाली आहे, असे ना.रामदास आठवले म्हणाले.

SCROLL FOR NEXT