Latest

अजित पवार यांची राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना तंबी, म्हणाले ‘हे’ चालणार नाही

अमृता चौगुले

बारामती, पुढारी वृत्तसेवा: आम्ही बारामतीत नसलो की काहीजण अजित पवार, सुप्रिया सुळे समजतात, असे काहींनी मला सांगितले आहे. काही जण तर पनवेलला जातात असे देखील माझ्या कानावर आले आहे. या संबंधीच्या चिठ्ठ्या माझ्याकडे आल्या आहेत. पक्षवाढीसाठी, नागरिकांच्या कामांसाठी तुम्हाला पदे दिली आहेत. त्यामुळे पदाधिकाऱ्यांनो हे चालणार नाही, अशी तंबी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी बारामतीत कार्यकर्ता मेळाव्यात दिली. दरम्यान पवार यांच्या भाषणाचा रोख नेमका कोणा-कोणाकडे होता, याची चर्चा या मेळाव्यानंतर रंगली.

सोमवारी (दि. २७) येथील राष्ट्रवादी भवनात आयोजित मेळाव्यात पवार बोलत होते. यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधताना स्वपक्षियांनाही सोडले नाही. अनेकांना कानपिचक्या दिल्या. पक्ष संघटनेसाठी वेळ काढा अन्यथा वेगळा विचार करावा लागेल, असा सज्जड इशाराही पवार यांनी यावेळी दिला.

पवार म्हणाले, बारामतीकरांपर्यंत पोहोचण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. आपण केलेली विकासकामे जनतेपर्यंत गेली पाहिजेत. मीच किती रेटायचे. तुम्ही मोकळीक दिली तर मी राज्यात फिरेल. मीच काही मक्ता घेतलेला नाही. महिलांसह राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी किमान एक दिवस तरी राष्ट्रवादीच्या कार्यालयात उपलब्ध असणे गरजेचे आहे. याशिवाय माळेगाव, छत्रपती, सोमेश्वरच्या अध्यक्षांनी देखील पक्ष कार्यालयात बसले पाहिजे. प्रत्येकाचा प्रश्न सोडविला पाहिजे. मी येथे असताना पदाधिकारी बोलतात, पण माझी पाठ फिरल्यावर काही जण स्वत:ला आमदार, खासदार समजतात. असं कानावर आलं आहे. हे खरं असेल तर त्यामध्ये दुरुस्ती करा.

सर्व कार्यकर्त्यांनी जबाबदारीने काम केले पाहिजे. काही जण पनवेलला जातात, असे देखील कानावर आले आहे. सत्ता असो वा नसो आपली सामान्य माणसांची नाळ जोडलेलीच पाहिजे. पदाधिकारी नागरिकांना ताटकळत ठेवतात हे चालणार नाही, असेही पवार म्हणाले.

विरोधकांचे प्रेम उतू चाललेय

बारामतीत आजकाल विरोधकांचं प्रेम ऊतू चालले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी विरोधकांच्या सभेला सहज देखील जाऊ नये. अन्यथा कटू निर्यय घेण्याची वेळ माझ्यावर येईल. बारामतीत येऊन वल्गना करणाऱ्या वाचाळवीरांकडे लक्ष देऊ नका, असे पवार म्हणाले.

पदे घेता मग वेळ द्या

कार्यकर्ते पद घेतात पण वेळ देत नाहीत. हे चालणार नाही. प्रत्येक संघटनेच्या कामाला पदाधिकाऱ्यांनी वेळ देणे आवश्यक आहे. पक्षातर्फे आयोजित आंदोलन, मोर्चे व इतर उपक्रमांकडे अनेकजण पाठ फिरवतात. हे चालणार नाही. वेळ न देणाऱ्यांची यादी माझ्याकडे द्यावी. त्यानुसार भविष्यात संधी देताना निर्णय घेणार असल्याचे पवार म्हणाले.

ठेकेदाराला त्याच्या ठिकाणी ठेवा

राष्ट्रवादीचे काही पदाधिकारी ठेकेदाराला बाजूच्या खोलीत नेऊन त्याच्याशी बोलतात, असे माझ्या ऐकण्यात आले आहे. हे झाले नाही पाहिजे. ठेकेदाराला ठेकेदाराच्या ठिकाणी ठेवा, असे आवाहन पवार यांनी केले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT