Latest

“माझी आतल्या गोटातली माहिती आहे की…”, अजित पवारांचं पुणे लोकसभा निवडणुकीबाबत मोठं विधान

अमृता चौगुले

पुढारी ऑनलाईन : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज सकाळी पुण्याच्या टिंबर मार्केटला भेट दिली. येथे लागलेल्या आगीने मोठं नुकसान झाल्याचं समोर आलं. त्याची पाहणी अजित पवारांनी केली. या पाहणीनंतर संबंधित अधिकाऱ्यांनी व्यापाऱ्यांना मदत करावी, अशी अपेक्षा अजित पवारांनी व्यक्त केली. यावेळी राजकीय भूमिका मांडण्यास त्यांनी नकार दिला असला, तरी राज्यातील आगामी निवडणुकीबाबत त्यांनी मोठं विधान यावेळी केलं आहे.

शनिवारी अजित पवार रयत शिक्षण संस्थेच्या बैठकीसाठी पुण्यात हजर असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचीही महत्त्वपू्र्ण बैठक आयोजित करण्यात आल्याचं म्हटलं जात होतं. या बैठकीबाबत विचारणा केली असता अशी कोणतीही बैठक आयोजित करण्यात आलेली नाही, असं अजित पवारांनी स्पष्ट केलं. "कसली राष्ट्रवादीची बैठक, कोण सांगतं तुम्हाला? तुम्हाला ही धादांत खोटी माहिती मिळाली आहे. अशी कोणतीही बैठक आयोजित करण्यात आलेली नाही. रयत शिक्षण संस्थेच्या तीन वर्षांसाठी नेमणुका होतात. वेगवेगळ्या विभागातील पदाधिकाऱ्यांच्या निवडी आहेत. त्यासाठीची बैठक आहे", असं अजित पवार म्हणाले.

दरम्यान, एकीकडे राजकीय प्रतिक्रिया देण्यास नकार देतानाच अजित पवारांनी सध्या नेतेमंडळींकडून देण्यात येत असलेल्या प्रतिक्रियांवर टीका केली. "सध्या काही जण हलक्या दर्जाची विधानं करतात. दर्जाहीन वक्तव्य करतात. याचा आपण सर्वांनी विचार करायला हवा", असंही ते म्हणाले.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी स्वतंत्र निवडणूक लढवण्याची भूमिका मांडल्यासंदर्भात अजित पवारांना विचारणा केली असता त्यांनी त्यावर सूचक विधान केलं. "राजू शेट्टी म्हणाले मी स्वतंत्र उभा राहणार, ६ लोकसभा जागा लढवणार. प्रत्येकजण आपापली भूमिका मांडत आहे. या सर्वांना जे काही बोलायचंय ते बोलू द्या. एकदा निवडणुका जाहीर होऊन निर्णय होईल तेव्हाच हे सगळं स्पष्ट होईल", असं पवार म्हणाले.

दरम्यान, पुणे लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक लागण्याची शक्यता यावेळी अजित पवारांनी बोलून दाखवली. "मला एक बातमी अशीही कळली आहे. मला वाटत होतं की, लोकसभा निवडणुकीला एक वर्ष राहिलंय. त्यामुळे पोटनिवडणूक लागणार नाही. पण बहुतेक पुणे लोकसभा मतदारसंघात गिरीश बापट यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक लागण्याची शक्यता आहे. अशी माझी आतल्या गोटातली माहिती आहे", असं पवार म्हणाले.

SCROLL FOR NEXT