Latest

दादांचा कारभार पुन्हा पालकमंत्री स्टाईल! पुणे जिल्ह्याच्या राजकारणाला दे धक्का

अमृता चौगुले

पिंपरी(पुणे) : पुणे जिल्ह्यातील विकासकामांचा आढावा दर आठवड्याला पुण्यात येऊन घेणार असल्याचे स्पष्ट करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या पालकमंत्री काळातील कामाची आठवण करून देत जिल्ह्याच्या राजकारणाची सूत्रे आपल्या होती घेत राजकीय धक्का दिला आहे.

महायुतीत सहभागी झाल्यानंतर उपमुख्यमंत्री म्हणून पिंपरी-चिंचवडच्या पहिल्याच दौर्‍यात शुक्रवारी त्यांचे पिंपरी-चिंचवडमध्ये जोरदार स्वागत झाले. यामुळे भारावून गेलेल्या पवारांनी जिल्ह्यातील भविष्यातील राजकारण ढवळून काढणार असल्याचे संकेत दिले. पिंपरी-चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांसमवेत त्यांनी बैठक घेऊन स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा फुंकलीच शिवाय पुणे महापालिका आणि जिल्ह्याच्या विकासकामांमध्येही जातीने लक्ष घालणार असल्याचे त्यांनी सांगितले. पुण्याचे पालकमंत्री असताना ज्या पद्धतीने ते काम करायचे त्याच स्टाईलने यापुढे काम होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

भविष्यातील वचननामाच जाहीर

मेट्रोपासून रिंगरोड ते विमानतळाच्या कामांबाबतची माहिती देऊन ही कामे मार्गी लावण्यासाठी अर्थमंत्री म्हणून राज्य आणि केंद्र स्तरावर पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले खरे, मात्र ही सर्व कामे मार्गी लागल्याचे सांगून निवडणुकीत श्रेय घेण्याच्या भाजपच्या मुद्द्यालाच त्यांनी पूर्णविराम दिला. इतकेच नव्हे, पुणेकरांचे राहणीमान उंचावण्यासाठी उड्डाण पुलापासून पाण्यापर्यंतच्या प्रश्नासाठी पाठपुरावा करणार असल्याचा वचननामाच त्यांनी जाहीर केला.

युतीमागचा राजकीय अजेंडा स्पष्ट

शरद पवार यांच्याशी बंड करून युतीत जाण्याचे कारण काय, या प्रश्नाचे उत्तरही अजित पवारांनी देऊन टाकले. पंतप्रधान मोदींमुळे देशाची आर्थिक स्थिती सुधारण्याबरोबरच जगभरात भारताची प्रतिमा उंचावली आहे. खंबीर नेतृत्वाला साथ देण्यासाठी युतीत सहभागी झाल्याचा वारंवार उच्चार त्यांनी केला. सर्व जात-धर्म आणि वंचित घटकासाठी काम करणार असल्याचे सांगून या युतीमागचा राजकीय अजेंडाही त्यांनी स्पष्ट केला.

पदाधिकार्‍यांची गोची

अजित पवारांनी युतीत सहभागी झाल्यानंतर भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या गोटात खदखद होती. पवारांच्या आजच्या दौर्‍यामुळे स्थानिक पदाधिकार्‍यांची गोची झाली. महापालिकेत सत्तेत असलेल्या भाजपच्या कामांची चौकशी करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. शिवाय यापुढील कामकाजामध्येही लक्ष घालणार असल्याचे त्यांनी सांगितले. पवार सत्तेत असल्याने आता टीका करता येणार नाही आणि स्थानिक पदाधिकार्‍यांना घेऊन त्यांनी अप्रत्यक्ष महापालिकेत सत्तेवरच दावा ठोकल्याने सोसवेना आणि सांगताही येईना, अशी अवस्था मित्र पक्षाची झाली आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT