Latest

NCP News | ४३ आमदारांच्या पाठिंब्याचा अजित पवार गटाचा दावा

Arun Patil

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : आमच्याकडे विधानसभेतील राष्ट्रवादीच्या 53 आमदारांपैकी 43, तर विधान परिषदेतील 9 पैकी 6 आमदार आहेत, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी केला आहे. येत्या 6 ऑक्टोबरपासून निवडणूक आयोगासमोर सुनावणी होणार आहे. या सुनावणीला अजित पवार व शरद पवार गटांच्या नेत्यांना प्रत्यक्ष हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. (NCP News)

अजित पवार गटाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दावा केला की, नोव्हेंबर 2023 पर्यंत देशातील सात राज्यांमध्ये होणार्‍या विधानसभा निवडणुकांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ हे निवडणूक चिन्ह आणि पक्षाचे नाव अजित पवार गटाला मिळेल.

पटेल म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेक वर्षांपासून पक्षांतर्गत निवडणुका झाल्या नाहीत. पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये 7 ते 8 प्रदेशाध्यक्षांच्या झालेल्या निवडणुका बेकायदेशीर आहेत. तसेच इतर राज्यांतील काही प्रादेशिक पक्षांच्या बाबतीत केंद्रीय निवडणूक आयोगाने संघटनात्मक पदांकडे न पाहता मूळ पक्षातून बाहेर पडलेल्या लोकप्रतिनिधींची संख्या विचारात घेऊन न्याय दिला आहे.

उत्तर प्रदेशमधील समाजवादी पक्षाच्या बाबतीत मुलायमसिंह यांच्याकडील कार्यकारिणीचा विचार केंद्रीय निवडणूक आयोगाने केला नाही; तर अखिलेशसिंह यांच्यासोबतची लोकप्रतिनिधी अधिकची संख्या पाहून त्यांच्या गटाला समाजवादी पक्ष हे पक्षाचे नाव आणि सायकल हे निवडणूक चिन्ह आयोगाने दिले आहे. हे पटेल यांनी निदर्शनास आणून दिले.

आमच्याकडे विधानसभेतील राष्ट्रवादीच्या 53 आमदारांपैकी 43, तर विधान परिषदेतील 9 पैकी 6 आमदार आहेत, असा दावा पटेल यांनी केला. (NCP News)

6 ऑक्टोबरपासून सुनावणी

अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली सत्तेत सहभागी झाल्यानंतर शरद पवार यांच्या गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्षाचे नाव आणि घड्याळ या निवडणूक चिन्हावर दावा केला आहे. याविरोधात आमच्याही गटाने आयोगाकडे याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर 6 ऑक्टोबरपासून सुनावणी सुरू होणार आहे. नोव्हेंबर 2023 पर्यंत देशातील सात राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. शरद पवार यांच्या गटाने या निवडणुका घड्याळ चिन्हावर लढण्याचे ठरविले आहे. परंतु, सात राज्यांतील निवडणुका जाहीर होण्यापूर्वी केंद्रीय निवडणूक आयोग आमच्या याचिकेवरील निकाल देईल. आमच्याकडील लोकप्रतिनिधींच्या जादा संख्येच्या आधारावर आयोग निकाल आमच्या बाजूने देऊ शकेल, असा दावा पटेल यांनी केला.

नागालँडच्या सात आमदारांचा पाठिंबा

दरम्यान, मार्च 2023 मध्ये नागालँडमध्ये भाजपच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन करताना तेथील राष्ट्रवादीच्या सात आमदारांनी पक्षाने दिलेल्या आदेशानुसार सरकारला पाठिंबा दिला होता. त्यानंतर 30 जून रोजी अजित पवार गटाने घेतलेली स्वतंत्र बैठक आणि हा गट राज्याच्या सत्तेत सहभागी झाल्यानंतर या सातही आमदारांनी अजित यांना पाठिंबा दिला होता. या आमदारांसह महिला आघाडी, युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आणि प्रमुख पदाधिकार्‍यांची ओळख प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी करून दिली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT