Latest

NCP Crisis : शरद पवार गटाच्या खासदारांच्या अपात्रतेसाठी अजित पवार गट आक्रमक, पिठासीन अधिकाऱ्यांना साकडे

रणजित गायकवाड

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : NCP Crisis : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना खासदारपदावरून हटविण्यासाठी शरद पवार गटाने राज्यसभा सभापती आणि लोकसभाध्यक्षांकडे केलेल्या मागणीनंतर आता अजित पवार गटही आक्रमक झाला आहे. शरद पवार गटाच्या उर्वरित सर्व खासदारांना अपात्र ठरवावे यासाठी अजित पवार गटाने पिठासीन अधिकाऱ्यांकडे धाव घेतली आहे. अर्थात, ही मागणी करताना अजित पवार गटाने शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांना मात्र वगळले आहे. दोन्हीही गटांच्या मागण्या पिठासीन अधिकाऱ्यांच्या विचाराधीन आहेत.

अजित पवार गटाचे लोकसभेतील खासदार सुनील तटकरे यांना अपात्र ठरविण्याची मागणी करणारे पत्र खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांना तर राज्यसभेमध्ये प्रफुल्ल पटेल यांच्या अपात्रतेची मागणी करणारे पत्र खासदार वंदना चव्हाण यांनी राज्यसभा सभापतींना अलिकडेच दिले होते. या पत्रानंतर अजित पवार गटानेही प्रत्युत्तरादाखल वंदना चव्हाण आणि फौजिया खान या शरद पवार गटाच्या राज्यसभेतील दोन्ही महिला खासदारांच्या अपात्रतेची मागणी करणारे पत्र राज्यसभा सभापतींकडे सादर केले. त्यासोबतच लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडेही अजित पवार गटाने पत्र पाठवून मागणी केली आहे की लोकसभेतील शरद पवार गटाचे खासदार श्रीनिवास पाटील, डॉ. अमोल कोल्हे आणि लक्षद्वीपचे खासदार मोहम्मद फैजल यांना अपात्र ठरविले जावे.

संसदेच्या दोन्ही सभागृहांमधील पिठासीन अधिकाऱ्यांकडे अपात्रतेबाबत अजित पवार गटाने केलेल्या मागणीनंतर अपात्रतेबाबत काय कारवाई होणार याची चाचपणी शरद पवार गटाने चालविली असल्याचे समजते. राज्यसभा सभापती जगदीप धनकड यांची खासदार सुप्रिया सुळे यांनी अलिकडेच घेतलेली भेट हा याच चाचपणीचा भाग असल्याचेही बोलले जात आहे.

SCROLL FOR NEXT