Latest

हवेच्या प्रदूषणामुळे वाढू शकतो अल्झायमर्स

Arun Patil

वॉशिंग्टन : एका नव्या संशोधनातून समोर आले आहे की जे लोक प्रदूषित वातावरणात अधिक काळ व्यतित करतात, त्यांच्या मेंदूमध्ये अल्झायमर रोगाशी संबंधित अमाइलॉईड प्लाकचे प्रमाण वाढण्याची शक्यता अधिक असते. पर्यायाने अशा लोकांमध्ये अल्झायमर्स वाढू शकतो.

अल्झायमर हा उतार वयात होणारा मेंदूचा एक असाध्य विकार आहे. विस्मरणाशी संबंधित या आजाराने जगभरातील अनेक लोक पीडित आहेत. न्यूरॉलॉजीच्या ऑनलाईन अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या एका संशोधनामध्ये आता याबाबतची माहिती देण्यात आली आहे; मात्र हवेचे प्रदूषण हेच मेंदूमधील अमाइलॉईड प्लाकचे कारण बनते असे यामध्ये म्हटलेले नाही. या दोन्हीमध्ये संबंध असल्याचे नव्या संशोधनात दिसून आले. अमेरिकेतील जॉर्जियामधील एमोरी विद्यापीठाच्या संशोधकांनी 224 लोकांच्या मेंदूच्या उतींची तपासणी केली.

ऊती म्हणजे पेशींचा समूह. या सर्व लोकांनी मृत्यूनंतर आपला मेंदू दान करण्याची संमती दिलेली होती. त्यांचा मृत्यू वयाच्या सरासरी 76 व्या वर्षी झाला होता. संशोधकांनी या लोकांच्या घरांचे पत्ते पाहून अटलांटा भागातील रहदारीच्या क्षेत्रातील निवासाचा तसेच तेथील हवेच्या प्रदूषणाच्या जोखमीचाही अभ्यास केला. मृत्यूपूर्वी एक वर्ष आधीच्या एक्सपोजरचा सरासरी स्तर 1.32 मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर आणि तीन वर्षांमधील स्तर 1.35 मायक्रोग्रॅम प्रति घन मीटर होता. त्यानंतर संशोधकांनी प्रदूषणाच्या जोखमीची तुलना मेंदूच्या अल्झायमर रोगाच्या लक्षणांशी केली. त्यांना आढळले की मृत्यूपूर्वी एक आणि तीन वर्षांपूर्वी हवेच्या प्रदूषणाच्या संपर्कात राहणार्‍या लोकांच्या मेंदूतील अमाइलॉईड प्लाकचा स्तर अधिक असण्याची शक्यता जास्त होती.

SCROLL FOR NEXT