Latest

भविष्यातील एअर अ‍ॅम्ब्युलन्स!

Arun Patil

कॅलिफोर्निया : धकाधुकीच्या या आयुष्यात कोण, केव्हा आजारी पडेल हे सांगता येत नाही. ऐनवेळी धावपळ नको यासाठी बरेच जण आरोग्य विमाही उतरवतात. पण यानंतरही एक समस्या असते, ती म्हणजे अचानक गरज पडल्यास हॉस्पिटलात वेळीच पोहोचणे! भारतात तर कित्येकांना आपले प्राण वेळीच उपचार न मिळाल्याने गमवावे लागतात. काही ठिकाणी ट्रॅफिक जॅमची समस्या असते, काही ठिकाणी एअर अ‍ॅम्ब्युलन्स वेळेत पोहोचू शकत नाही, काही ठिकाणी हॉस्पिटलेच दूर असतात. अशी अनेक कारणे असतात. पण, यावर मार्ग काढण्यासाठी आता एअर अ‍ॅम्ब्युलन्सचा पर्याय विचाराधीन आहे.

आता एअर अ‍ॅम्ब्युलन्ससारखा महागडा पर्याय किती प्रमाणात परवडेल व किती प्रमाणात उपलब्ध होऊ शकेल, याबाबतचे चित्र अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. पण जेथे गरज आहे तिथे रुग्णांना एअरलिफ्ट करून वेळीच हॉस्पिटलमध्ये पोहोचवण्यासाठी एअर अ‍ॅम्ब्युलन्सचा पर्याय समोर आला आहे. या एअर अ‍ॅम्ब्युलन्सचा ताशी वेग 288 किलोमीटर इतका असेल आणि प्रायोगिक स्तरावर त्याची प्रारंभी चाचपणी केली जाणार आहे.

या एअर अ‍ॅम्ब्युलन्समध्ये दोन क्रू मेंबर असतील. यातील एक पायलट असेल, तर दुसरा फर्स्ट रिस्पाँडर. कॅलिफोर्नियाच्या जम्प अ‍ॅरो कंपनीने यासाठी पुढाकार घेतला असून, ही संकल्पना आवडल्याने अमेरिकन हवाई दलाने त्यांच्याशी यासाठी 30 कोटी रुपयांचा करार संमत केला आहे.

जम्प अ‍ॅरो कंपनीला याशिवाय डेन्मार्कच्या एका अ‍ॅम्ब्युलन्स कंपनीकडूनही ऑर्डर मिळाली आहे. या भविष्यातील एअर अ‍ॅम्ब्युलन्सची अतिशय सावधपणे रचना केली गेली आहे. टेकऑफ करताना आणि लँडिंग करताना रुग्णाला कोणताही त्रास होऊ नये आणि त्याचबरोबर पायलटच्या पोझिशनचीदेखील यात काळजी घेण्यात आली आहे. ही अ‍ॅम्ब्युलन्स केवळ 8 मिनिटांत रुग्णाला हॉस्पिटलमध्ये पोहोचवू शकते, असे या कंपनीचा दावा आहे. सध्या ही योजना फक्त प्रायोगिक स्तरावर असली तरी ती प्रत्यक्षात साकारली जाईल, त्यावेळी ती एक नवी क्रांती असणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT