पुढारी ऑनलाईन : एआय अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) मुळे प्रगत अर्थव्यवस्थांमधील ६० टक्के नोकऱ्यांवर आणि जगभरातील सुमारे ४० टक्के नोकऱ्यांवर परिणाम होणार आहे, असे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) ने ताज्या एका अहवालात म्हटले आहे. IMF च्या व्यवस्थापकीय संचालिका क्रिस्टालिना जॉर्जिव्हा यांनी या अहवालावर बोलताना AI मुळे जोखीम आणि संधी या दोन्हींवर भाष्य केले. एकूणच AI ही 'दुधारी तलवार' असू शकते, असे स्पष्ट केले आहे.
त्यांनी दावा केला की AI टेक्नॉलॉजीमुळे जगभरातील नोकऱ्यांना धोका आहे. पण यामुळे उत्पादकतेच्या पातळीला चालना देण्यासाठी आणि जागतिक वाढीला चालना देण्यासाठी एक मोठी संधीदेखील आहे. "तुमची नोकरी पूर्णपणे जाऊ शकते. हे चांगले नाही… पण कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे तुमची नोकरीत प्रगती होऊ शकते. त्यामुळे तुम्ही प्रत्यक्षात अधिक उत्पादनक्षम व्हाल आणि तुमचे उत्पन्न वाढू शकते," असे जॉर्जिव्हा यांनी स्पष्ट केले.
AFP वृत्तानुसार, अहवालात असे नमूद केले आहे की AI ने प्रभावित झालेल्या नोकऱ्यांपैकी केवळ अर्ध्या नोकऱ्यांवर नकारात्मक परिणाम होईल. बाकीच्यांना AI मुळे वाढलेल्या उत्पादकता नफ्याचा फायदा होऊ शकतो. पण, हा परिणाम असमान असणे अपेक्षित आहे. उदयोन्मुख बाजारपेठेतील आणि विकसनशील अर्थव्यवस्थांमधील श्रमिक बाजारांना AI मुळे सुरुवातीला कमी परिणाम दिसतील. पण कामाच्या ठिकाणी त्याच्या एकत्रीकरणामुळे उद्भवलेल्या वाढीव उत्पादकतेचा फायदा होण्याची क्षमतादेखील कमी आहे.
जॉर्जिव्हा यांनी कमी उत्पन्न असलेल्या देशांना AI द्वारे मिळणाऱ्या संधीच्या आधारे पुढे जाण्याच्या आवश्यतेवर जोर दिला. "होय म्हणूनच कृत्रिम बुद्धिमत्ता, थोडी धडकी भरवणारी टेक्नॉलॉजी आहे. पण प्रत्येकासाठी ही एक जबरदस्त संधी देणारीदेखील आहे," असे त्यांनी म्हटले आहे.
IMF या महिन्याच्या अखेरीस अद्ययावत आर्थिक अंदाज प्रसिद्ध करणार आहे. जॉर्जिव्हा यांनी संकेत दिले आहेत की जागतिक अर्थव्यवस्था मागील अंदाज पूर्ण करण्याची शक्यता आहे आणि ती "सॉफ्ट लँडिंगसाठी तयार आहे." दरम्यान, २०२४ हे जगभरातील वित्तीय धोरणासाठी "खूप कठीण वर्ष" असण्याची शक्यता असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. त्याचे कारण म्हणजे देश कोविड -१९ साथीच्या आजारादरम्यान वाढलेल्या कर्जाच्या ओझ्याला समोरे जाण्याचा आणि कमी झालेला बफर साठा पुन्हा निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत.
या वर्षी निवडणुका असल्याने लोकांचा पाठिंबा मिळवण्यासाठी खर्च वाढवण्यावर अथवा कर कमी करण्यासाठी सरकारवर अतिरिक्त दबाव आहे. जॉर्जिव्हा यांनी चिंता व्यक्त केली की जगभरातील सरकारे या वर्षी मोठा खर्च करू शकतात आणि उच्च महागाईवाढीविरुद्धच्या लढ्यात त्यांनी केलेली प्रगती कमी होऊ शकते.
आयएमएफच्या प्रमुखपदी जॉर्जिव्हा यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ या वर्षी संपणार आहे. त्यांनी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे नेतृत्व करणाऱ्या दुसर्या कार्यकाळासाठी निवडणूक लढवण्याचा आपला इरादा आहे की नाही यावर भाष्य करण्यास नकार दिला. "सध्या मला एक गोष्ट करायची आहे आणि मी ती गोष्ट करण्यावर लक्ष केंद्रित करत आहे," असे त्या म्हणाल्या.
हे ही वाचा :