Latest

प्रगतीसाठी नवनिर्मिती आवश्यकच

Arun Patil

जगातील संसाधनांची उपलब्धता नेहमीच मर्यादित असणार आहे, ज्यामुळे आपल्याला या संसाधनांचा प्रभाव वाढवण्याची गरज असते. आपण जो पैसा खर्च करत असतो, त्यातून जास्तीत जास्त परतावा मिळवायचा असेल, तर नवनिर्मिती महत्त्वाची आहे आणि 'एआय' अशा शोधांचा वेग किती तरी वाढवणार आहे, हा वेग आपण यापूर्वी कधीच पाहिलेला नसेल.

सरत्या वर्षात पहिल्यांदाच मी कामासाठी आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा (कृत्रिम बुद्धिमत्ता) वापर केला. पूर्वी माझा आर्टिफिशिअल इंटेलिजिन्सचा (एआय) वापर हा त्यातील नावीन्यामुळे होता. मला खात्री आहे की, हे इतर अनेकांबद्दल खरे ठरेल. तंत्रज्ञानातील फार मोठ्या स्थित्यंतराची ही सुरुवात आहे. हा काळ उत्साह वाढवणारा आणि तसाच गोंधळात टाकणाराही आहे. 'एआय' आपल्या भविष्याला कसा आकार देईल, याबद्दलची ही अनिश्चितता आहे; पण पूर्वीच्या तुलनेत आता काही स्पष्टताही आलेली आहे. 'एआय'चा वापर उत्पादकता वाढवणे, शिक्षणाचा प्रसार आणि मनोविकारांच्या उपचारात आणि इतरही बर्‍याच ठिकाणी होणार आहे.

मी आतापर्यंत जे काही काम केले आहे, त्याचा गाभा एकच राहिलेला आहे, तो म्हणजे प्रगतीसाठी नवनिर्मिती. यासाठीच मी मायक्रोसॉफ्टची स्थापना केली. तसेच दोन दशकांपूर्वी मेलिंडा आणि मी दोघांनी मिळून गेटस् फाऊंडेशनची सुरुवात केली आणि त्यामुळेच गेल्या शतकात जगभरातील अनेकांच्या जीवनात उन्नती झाली आहे. वयाच्या पाचव्या वर्षापर्यंत मृत्युमुखी पडणार्‍या मुलांची संख्या सन 2000 मध्ये निम्म्यावर आली, याचे कारण आहे नवनिर्मिती. संशोधकांनी लसी बनवण्याच्या नवीन पद्धती शोधल्या, ज्या वेगवान तर होत्याच त्याचबरोबर स्वस्त आणि सुरक्षितही होत्या. जगभरातील दुर्गम भागात या लसी पोहोचवण्याच्या नवीन पद्धती शोधण्यात आल्या, त्यामुळे या लसी अधिकाधिक मुलांपर्यंत पोहोचल्या. रोटव्हायरससारख्या जीवघेण्या आजारांवरही लस शोधण्यात आली. जगातील संसाधनांची उपलब्धता नेहमीच मर्यादित असणार आहे, ज्यामुळे आपल्याला या संसाधनांचा प्रभाव वाढवण्याची गरज असते. आपण जो पैसा खर्च करत असतो, त्यातून जास्तीत जास्त परतावा मिळवायचा असेल, तर नवनिर्मिती महत्त्वाची आहे आणि 'एआय' अशा शोधांचा वेग किती तरी वाढवणार आहे, हा वेग आपण यापूर्वी कधीच पाहिलेला नसेल.

'एआय'चा आतापर्यंतचा सर्वात मोठा प्रभाव हा नव्या औषधनिर्मितींवर होणार आहे. 'एआय'चा वापर करून नवीन औषधांच्या शोधाची प्रक्रिया मोठ्या प्रमाणावर वाढू शकते. काही कंपन्या या पद्धतीने कॅन्सरवर औषध निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. गेटस् फाऊंडशेनमध्ये एड्स, मलेरिया, टीबी अशा आजारांवर उपाययोजना करण्यासाठी 'एआय'चा वापर करणे याला मोठे प्राधान्य देण्यात आले आहे. हे आजार जगातील गरिबांवर सर्वाधिक परिणाम करत आहेत.

जे खालचे आणि मध्यम उत्पन्न गटातील देश आहेत, त्यांच्यातील जीवनमान सुधारण्याची फार मोठी क्षमता 'एआय'मध्ये आहे. मी काही दिवसांपूर्वी सेनेगलला गेलो होतो, येथे मला विकसित देशांतील अनेक संशोधकांना भेटता आले. हे संशोधक फार चांगले काम करत आहेत, 'एआय'च्या माध्यमातून त्यांच्या समुदायातील लोकांचे जीवनमान उंचावणे यासाठी ते काम करत आहेत. अर्थात, हे काम सध्या प्राथमिक स्थितीत असले, तरी या दशकाच्या अखेरच्या काळातील फार मोठ्या तांत्रिक विकासासाठी पायाभरणी होत आहे, हे निश्चित.

यातून ज्या प्रकारची कल्पकता मांडली जात आहे, ती फार प्रभावित करणारी आहे. मी यातील विविध टीमना भेटलो आहे. अँटिबायोटिकला प्रतिरोध करणार्‍या जैविक घटकांवर यातील एक टीम काम करत आहे. एचआयव्हीसाठी आपली जोखीम किती आहे याची, तसेच वैद्यकीय सेवा देणार्‍या कर्मचार्‍यांना अधिकाधिक माहिती मिळावी, यासाठी ते काम करत आहेत. विकसनशील देशांतील संशोधक त्यांच्या समाजातील महत्त्वाच्या आव्हानांवर मात करण्यासाठी जे प्रयत्न करत आहेत, ते पाहून मी थक्कच झालो. आता तुम्ही ही आकडेवारी लक्षात घ्या. जगात प्रत्येक दुसर्‍या मिनिटाला एका महिलेचा गरोदरपणात किंवा प्रसूतीकाळात मृत्यू होतो.

भारतातील 'आरमान' ही संस्था 'एआय'चा वापर करून ही परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न करत आहे. ज्या महिला गरोदरपणात अधिक धोकादायक स्थितीत आहेत, त्यांच्यावर उपचार करण्यासाठी भविष्यात 'एआय' सहकारी म्हणून काम करेल, असे या संस्थेचे प्रयत्न सुरू आहेत. ही संस्था 'लार्ज लँग्वेज मॉडेल' विकसित करत आहे, ज्याचा वापर इंग्रजी आणि तेलुगू अशा दोन्ही भाषांत करता येईल. वैद्यकीय सेवा देणार्‍या परिचारिकांच्या अनुभवानुसार हे मॉडेल काम करणार आहे, हे याचे वैशिष्ट्य आहे. अर्थात, अशा प्रकल्पासाठी फार दीर्घकाळ जाणार आहे. यात बरेच अडथळेही येतील. असे मॉडेल दीर्घकाळ कार्यरत राहावेत म्हणून त्यांना लागणारा बॅकएंड आणि विस्तार करत असताना दर्जामध्ये तडजोड होऊ न देणे, अशा महत्त्वाच्या अडथळ्यांचा सामना करावा लागणार आहे.

पण, अर्थातच लाभांचा विस्तार करताना आपल्याला 'एआय'मधील काही धोक्यांवर उपाययोजना कराव्या लागतील. त्यामध्ये पूर्वग्रह आणि भ्रम यांचा समावेश आहे. 'एआय'च्या भाषेत भ्रम म्हणजे अशी स्थिती की, ज्यात 'एआय' एखादी चुकीची गोष्टही खरी असल्याचा ठामपणाने दावा करू लागतो. अशी परिस्थिती विशेषकरून वैद्यकीय पार्श्वभूमीवर फार धोकादायक ठरू शकते. काही संशोधकांना असे वाटते की, भ्रम ही 'एआय'च्या व्यवस्थेचा भाग आहे; पण मी याच्याशी सहमत नाही. 'एआय'ची जी प्रारूपे आहेत, त्यांना वस्तुस्थिती आणि कल्पना यांच्यातील भेद कळण्यासाठी प्रशिक्षित करता येते, असे माझे ठाम मत आहे. ओपन 'एआय' यासाठी फार चांगल्या पद्धतीने काम करत आहे.

'एआय'वर आधारित जे प्रॉडक्ट बनणार आहेत, ते वापरकर्त्यांच्या गरजेनुसार असतील, याचीही आपल्याला काळजी घ्यायची आहे. उदाहरण जर घ्यायचे असेल, तर 'एआय'वर आधारित प्रॉडक्ट 'सोमनासी'चे घेऊ शकतो. केनियातील हे टूल वापर करणार्‍या विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार बदलते. स्थानिक अभ्यासक्रम, स्थानिक संस्कृती याचा विचार करून हे 'सोमनासी' विकसित करण्यात आले आहे.

खरे तर हे संशोधक अल्प आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांसाठी संशोधनाचा जो विचार करत आहेत, त्यापासून मलाच फार प्रेरणा मिळाली आहे. आपण जर आताच 'स्मार्ट' गुंतवणूक केली; तर 'एआय' नक्कीच न्याय्य अशी व्यवस्था आकारास आणेल. श्रीमंत जग आणि गरीब जग यांच्यात तंत्रज्ञान पोहोचण्याचा जो वेग आहे, तो 'एआय' नक्कीच कमी करेल. उदा., अमेरिकेतील सर्वसामान्य लोकसंख्या लक्षणीय असे 'एआय'चे तंत्रज्ञान वापरण्यासाठी फार तर 18 किंवा 24 महिने दूर आहे; तर आफ्रिकेतील लोक यापासून तीन वर्षे दूर आहेत. या कालावधीत अंतर दिसत असलं, तरी ते इतर नवनिर्मितींशी तुलना करता फारच कमी आहे.

हे जे अंतर आहे, ते कमी करणे जगातील असमतोल दूर करण्यासाठी कळीचा मुद्दा आहे. अगदी आव्हानात्मक काळातसुद्धा मी 'एआय'च्या भवितव्याबद्दल सकारात्मक आहे. मला असे वाटते की, 'एआय'चा वापर ज्यांना आत्यंतिक, फार निकडीची गरज आहे, अशांसाठीच्या प्रभावी तंत्रज्ञाननिर्मितीसाठी होऊ शकतो.

(गेटस् नोटस् या वेबसाईटवरील ब्लॉगमधून)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT