Latest

नगर: शिक्षक बँकेची 16 ला निवडणूक! स्थगिती उठवली; गुरुजी पुन्हा सिमोल्लंघनाच्या तयारीत

अमृता चौगुले

नगर, पुढारी वृत्तसेवा: शिक्षक बँक निवडणुकीवरील स्थगिती सोमवारी (दि.26) न्यायालयाने अखेर उठविली. न्यायालयाच्या आदेशाने 16 ऑक्टोबर रोजी मतदान, आणि दुसर्‍या दिवशी 17 ला मतमोजणी घेण्यात येणार असल्याची माहिती अ‍ॅड. शिवाजीराव शेळके यांनी दिली. दरम्यान, घटस्थापनेपासूनच बँकेवरील सत्ता स्थापनेसाठीही सत्ताधारी तसेच विरोधकांनी पुन्हा एकदा मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यामुळे बँकेची चौरंगी लढत चांगलीच चुरशीचे होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

शिक्षक बँकेवरील सत्तेसाठी सुरुवातीपासूनच विरोधक सीमोल्लंघनाच्या तयारीत आहेत. मात्र, 30 सप्टेंबरपर्यंत सहकारातील निवडणुकांना बे्रेक लागल्याने इच्छुकांची निराशा झाली होती. न्या. रवींद्र घुगे व न्या. अर्जून पेडणेकर यांच्यासमोर काल सुनावणी झाली. सत्ताधारी बापूसाहेब तांबे यांच्या गुरुमाऊलीकडून उमेदवार बाळासाहेब सरोदे, रामेश्वर चोपडे, महेश भनभने, गोरक्षनाथ विटनोर, बाळासाहेब मुखेकर हे सुनावणीवेळी हजर होते. यांच्यावतीने अ‍ॅड. शिवाजीराव शेळके यांनी युक्तिवाद केला. तर यापूर्वी रोहोकले गुरुजींकडून प्रवीण ठुबे, गणेश वाघ, विकास डावखरे, दशरथ ढोले, संतोष खामकर आदींनी निवडणूक घेण्याबाबत याचिका दाखल केली होती. त्यांच्या वतीने अ‍ॅड. गुलाबराव राजळे, अ‍ॅड. राजेंद्र टेमकर यांनी बाजू मांडली. या सुनावणीत न्यायालयाने निवडणुकीवरील स्थगिती उठविण्याचा निर्णय घेतला असून, 16 ऑक्टोबरला निवडणूक घेण्यासाठी हिरवा कंदिल दर्शविला आहे.

निवडणूक निश्चित होताच, सत्ताधारी नेतेमंडळी आजपासून पुन्हा आपल्या प्रचाररुपी अजेंड्यातून सभासदांना जणू विचारांचे 'सोने' वाटण्याच्या तयारीत आहे. तर, विरोधी गुरुजींनीही कालच मेळावा घेऊन त्यात बँकेतील अपहार, भ्रष्टाचाररुपी रावणाचे दहन करण्याची भीष्मप्रतिज्ञाच केली आहे. याउलट, डॉ. कळमकर यांचा गट संधी समजून दोन्ही गुरुमाऊलींवर लक्ष ठेवून आहे, तर तिकडे चौथी आघाडीही कंबर कसून आहे. त्यामुळे ही निवडणूक प्रतिष्ठेची तितकीच चुरशीची होणार आहे.

दरम्यान, विकास मंडळाची निवडणुकही बँकेसोबतच घेतली जाणार आहे. या ठिकाणीची चौरंगी लढत रंगलेली आहे. येथे सत्ताधारी रोहोकले गट आहे. या चौरंगी लढतीत 10 हजार 706 सभासद विकास मंडळासाठी मतदान करणार आहेत. ही निवडणुकही बँकेइतकीच प्रतिष्ठेची बनलेली आहे. त्यामुळे विकास मंडळ कोणाच्या ताब्यात जाणार, याकडेही सभासदांचे लक्ष असणार आहे.

विकास मंडळाच्या 18 जागांसाठी चुरस

विकास मंडळाच्या 18 जागांसाठीही उमेदवारी अर्जाची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. बँकेची निवडणूक थांबल्याने विकास मंडळाचीही निवडणूक रखडली होती. मात्र, आता 16 तारखेला बँकेसोबत विकास मंडळाचीही निवडणूक होणार आहे. येथेही चौरंगी लढती रंगलेल्या आहेत.

सुनावणीनंतर आरोप-प्रत्यारोप सुरू!

सुनावणीत सत्ताधार्‍यांनी सभासदांना दिलेला लाभांशाला एका गटाने वकिलामार्फत विरोध केल्याचे निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला. तर, दुसरीकडून 'तो' वकील आमचा नव्हता, कदाचित 'डॉक्टरांचा' असावा, असे सांगून 'गुरुजी'च्या एका नेत्याने हात झटकले.

रोहोकले गुरुजीप्रणित गुरुमाऊली मंडळाच्या निष्ठावंत 130 कार्यकर्त्यांनी निधी गोळा करून बँकेची निवडणूक त्वरीत घ्यावी, यासाठी याचिका दाखल केली होती. त्याचा आज निकाल लागला. आम्ही बँकेतील भ्रष्टाचाररुपी रावणाचे दहन करण्याचा संकल्प केला आहे.

– विकास डावखरे, गुरूमाऊली, रोहोकले गट

विरोधकांनी वेगवेगळ्या मार्गाने आणि चुकीच्या पद्धतीने 'गुरुकुल'वर आरोप करण्याचा प्रयत्न केला आहे. पण त्याचा काही फायदा होणार नाही. प्रचारामध्ये कुठेही चिखलफेक न करता शिक्षकांचे पावित्र्य जपण्याचे काम 'गुरुकुल' करणार आहे. सभासद आमच्यासोबत आहेत.

– भास्करराव नरसाळे, गुरुकुल मंडळ

बँकेची निवडणूक घ्यावी, यासाठी आम्ही आग्रही होतोे. त्यासाठी याचिकाही दाखल केलेली होती. काल सुनावणीसाठी आमचे काही उमेदवारही तेथे हजर होते. आता 16 ला निवडणूक होणार आहे. चांगल्या कारभाराच्या जोरावर 17 तारखेला आमचा विजय निश्चित आहे.

– सलीम खान पठाण, गुरुमाऊली, तांबे गट

गुरुमाऊलीला सत्ता देऊन यांनी आपल्याच पोळ्यांवर तूप ओढले आहे. त्यामुळे बँकेतील भ्रष्टाचारात दोन्ही गुरुमाऊली सहभागी आहेत. कळमकर यांनाही एकदा सत्ता देऊन पाहिली आहे. त्यांचाही कडू अनुभव सभासदांना आहे. त्यामुळे सभासद यंदा आमचा पर्याय स्वीकारतील.
– एकनाथ व्यवहारे, चौथी आघाडी

SCROLL FOR NEXT