Latest

नगर शिक्षक बँक निवडणूक: तरुणाईची मते ठरली निर्णायक! तांबेंच्या ‘त्या’ खेळीची रोहोकले, कळमकर, शिंदेंवर मात

अमृता चौगुले

गोरक्षनाथ शेजूळ

नगर: शिक्षक बँकेची यंदाची निवडणूक शिक्षक भारती, स्वराज्य संघटनेभोवतीच चर्चेत राहिली. यातील शिक्षक भारतीला सत्ताधारी तांबे गटाने पूर्वीपासूनच सोबत घेतले, तर शेवटच्या टप्प्यात स्वराज्यलाही खिंडार पाडले. त्यामुळे तरूण मतदार शिक्षकांची ताकद मिळाल्याने गुरुमाऊलीचा विजय सुकर झाला.

शिक्षक बँकेसाठी सत्ताधारी बापूसाहेब तांबे यांच्या मार्गदर्शनात गुरुमाऊली 2015, तसेच त्यांच्या विरोधात ज्येष्ठ शिक्षक नेते रावसाहेब रोहोकले प्रणित गुरूमाऊली मंडळ, डॉ. संजय कळमकर यांचे गुरुकुल आणि राजेंद्र शिंदे यांच्या नेतृत्वातील सदिच्छा, बहुजन, शिक्षक संघ आणि साजीर यांची आघाडी मैदानात उतरली होती.

गत महिनाभर आरोप-प्रत्यारोप, कार्यकर्त्यांच्या फोडाफोडी, स्वीकृतची गाजरे, अशा अनेक पातळ्यांवर ही निवडणूक नेतेमंडळींनी हातात घेतली. नेत्यांनीच ही निवडणूक प्रतिष्ठेची केल्याने मोठी चुरस निर्माण होत गेली. या सर्व प्रक्रियेत सत्ताधारी तांबे गटाने पूर्वीपासूनच आघाडी घेतली. तर तांबेंना रोखण्यासाठी विरोधी मंडळांनीही आपापल्या परीने व्यूहरचना आखल्या होत्या.

निवडणुकीत 10 हजार 464 सभासदांपैकी 10233 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदारांचा उत्साह पाहता हे मतदान सत्ताधार्‍यांच्या विरोधात झाले असावे, असा अदांज बांधत विरोधकांनी जल्लोषाची तयारी केली, पण प्रत्यक्षात हिरमोड झाला. 21 पैकी 20 जागा तांबे गटाला मिळाल्या, तर विकास मंडळाच्या सर्व 18 जागांवर आघाडी घेतली होती. निकालानंतरच्या आकडेमोडीत काही शिक्षक नेत्यांनी 'तांबेंकडे तरूण मतदार आकर्षित झाल्याने तीच मते निर्णायक ठरल्याचा निष्कर्ष काढला. बापू तांबेंनी प्रारंभी शिक्षक भारती ही 400 मतांचा गठ्ठा असलेल्या संघटनेला स्वीकृत आणि उपाध्यक्ष पदाचा शब्द देवून जवळ केले होते. त्यानंतर 'स्वराज्य'चे कार्यकर्ते 'गुरुकुल'सोबत गेले असले, तरी या मंडळाचा जिल्हाध्यक्ष फोडून बापूंनी स्वतःकडे आणण्यात यश मिळवले.

याशिवाय विरोधी मंडळातील तरूण मतदार शिक्षकांनाही बापूंनी आपल्या मितभाषी स्वभावातून, तर कधी विनम्रतेतून जवळ करण्यात यश प्राप्त केले होते. या सर्व तरूणाईच्या जोरावरच गुरुमाऊली मंडळाला या निवडणुकीत निर्णायक मते मिळवून विजयश्री खेचता आल्याचे मतमोजणीनंतर स्पष्ट झाले आहे. या उलट विरोधकांना ही जुळवाजुळव करण्यात अपयश आल्यानेच त्यांना पराभव पत्कारावा लागल्याचेही पुढे आले आहे.

SCROLL FOR NEXT